mother murdered her addicted son in Usmanabad | वृद्ध आईनेच व्यसनाधीन मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या 
वृद्ध आईनेच व्यसनाधीन मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या 

समुद्रवाणी (जि़उस्मानाबाद) : व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्याच तरुण मुलाचा डोक्यात कुऱ्हाडीचे चार घाव घालून मातेने खून केल्याची घटना मंगळवारी समुद्रवाणी येथे घडली आहे़ पोलिसांनी दुपारी एका नातेवाईकांच्या घरातून त्या महिलेस ताब्यात घेतल्यानंतर तिने त्यांच्याकडे खुनाची कबुली दिली़ याप्रकरणी बेंबळी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील राम महादेव कावळे (वय ३५) हा त्याच्या आईसमवेत राहत होता़ त्याचे लग्न झाले असले तरी पत्नी दोन मुलासह माहेरीच राहत असते़  शिवाय, रामचे दोघे भाऊ हे शेजारीच दुसऱ्या घरात वास्तव्यास असतात़ दरम्यान, राम हा दारुच्या आहारी गेला होता़ त्याच्या या व्यसनाला वैतागून त्याच्या आईने मंगळवारी मध्यरात्री कुऱ्हाडीचे चार घाव घालून त्याचा खून केला़ त्याने किंकाळी फोडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या भावांनी आईकडे चौकशी केली असता, राम हा नेहमीप्रमाणे दारु पिऊन गोंधळ घालत असल्याचे तिने सांगितले.

मात्र, सकाळी या घराला कुलूप दिसले़ त्यामुळे रामचे भाऊ कुंडलिक व बालाजी यांनी मोबाईलवरुन रामला संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तो फोन उचलत नव्हता़ ही बाब त्यांनी गावातील पोलीस पाटील नामदेव ननवरे यांनी कळविली़ त्यांनी घरावरील पत्रा उचकटून आत पाहिले असता, राम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला़ यानंतर तातडीने बेंबळी पोलिसांना ही घटना कळविण्यात आली़ सहायक निरीक्षक यु़एम़ जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आल्यानंतर कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला

यावेळी मयत रामच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे चार घाव आढळून आले़ घराची तपासणी केली असता, सरपणात रक्ताने माखलेली कुऱ्हाड दिसून आली. ती ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर रात्री मयत राम व आई हे दोघेच घरी असल्याचे लक्षात आले़ पोलिसांनी रामच्या आईचा शोध घेऊन तिला औसा तालुक्यातील शिवली येथील एका नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले़ तिने पोलिसांसमोर मुलाच्या खुनाची कबुली दिली आहे़ 

यादरम्यान, पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड, गुन्हे शाखेचे निरीक्षक डी़एम़ शेख यांच्या आय बाईक पथक, ठसे तज्ज्ञ, श्वानपथक व कर्मचाऱ्यांनी भेट दिली़ अवघ्या दोनच तासाच्या आत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले़ याप्रकरणी संबंधित महिला आरोपीविरुद्ध बेंबळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: mother murdered her addicted son in Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.