येऊ द्या ना ईडीला; हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:12 PM2020-11-24T19:12:15+5:302020-11-24T19:13:12+5:30

ईडीच्या कारवाया यांच्यापेक्षा जास्त आमच्यावर झाल्या आहेत.

Let ED come; What to fear if hands are not involve in crime ? | येऊ द्या ना ईडीला; हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची ? 

येऊ द्या ना ईडीला; हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची ? 

googlenewsNext
ठळक मुद्दे केंद्रावरील आरोप नैराश्येतूनमग येऊ द्या सीडीही बाहेर

उस्मानाबाद : जर तुमचे हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची? येऊ द्या ना ईडीला. ते काय कोणाच्याही घरी येऊ शकतात. आजच्या कारवाईमुळे केंद्रावर जे आरोप करीत सुटले आहेत, ते नैराश्येतून केले जात आहेत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उस्मानाबादेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंगळवारी लगावला.

पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दानवे मंगळवारी उस्मानाबादेत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ईडीच्या कारवाया यांच्यापेक्षा जास्त आमच्यावर झाल्या आहेत. आम्ही यातून गेलो आहोत. पण काहीच सिद्ध झाले नाही. तो एक स्वतंत्र विभाग आहे. त्यांचे काम ते करीत आहेत. अतिवृष्टीची केंद्राकडून मदत मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. राज्यांनी ती पूर्ण करायची असते. ती केली असेल तर केंद्र लगेचच महाराष्ट्राला मदत देईल, असे सांगत अप्रत्यक्षरित्या राज्यानेच दिरंगाई चालविल्याचे दानवे यांनी सूचित केले. 

दरम्यान, काँग्रस-राष्ट्रवादीचे नेते ओबीसी समाजात मराठा आरक्षणावरुन अपप्रचार पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची तरतूद कायद्यात केलेली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का बसण्याचा विषयच नाही. स्वत:ची इमेज तयार करण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचेही दानवे म्हणाले. या सरकारने मराठवाडा वाटर ग्रीड, जलयुक्त शिवार योजना बंद केली. पोखरा योजना बंद केली. केवळ निधी बंद करण्याचे काम सरकार करीत आहे. त्यामुळे निर्माण झालेला रोष मतदार मतपेटीतून व्यक्त करीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, अशी आशाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड.मिलिंद पाटील, दत्ता कुलकर्णी, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, ॲड.नितीन भोसले उपस्थित होते.

सीडीही येऊ द्या...
नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी ईडी बाहेर काढल्यास आपणही सीडी बाहेर काढू, असा इशारा प्रवेशावेळी दिला होता. त्यांचा नामोल्लेख न करता दानवे म्हणाले, आपले मन स्वच्छ आहे. आपण काही केलेच नसल्यास कशाला कोणाची भिती, मग येऊ द्या सीडीही बाहेर, असे सांगत त्यांनी खडसेंवर पलटवार केला.

Web Title: Let ED come; What to fear if hands are not involve in crime ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.