दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 07:55 PM2019-08-05T19:55:54+5:302019-08-05T19:59:00+5:30

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातून मदत

Gorakh's dream of becoming a doctor can be realized through donor donations! | दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

googlenewsNext

- बालाजी आडसूळ 
कळंब (उस्मानाबाद ) : बिकट आर्थिक स्थितीमुळे मेडिकल प्रवेश अंधातरी बनलेल्या गोरख मुंडे या होतकरू विद्यार्थ्याची ‘अडथळ्याची शर्यत’ लोकमतने प्रकर्षाने मांडल्यानंतर राज्याच्या कानाकोपºयातून गोरखला मदतीचा ओघ सुरू झाला होता. यातूनच आता गोरखचा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश ‘निश्चित’ झाला. त्यामुळे आता संघर्षयात्रीचे ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

कळंब तालुक्यातील भोगजी या दुष्काळी गावातील अत्यंत नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या तुकाराम मुंडे यांना केवळ बारा गुंठे कोरडवाहू जमीन. यास्थितीत मजुरी करून ते आपल्या दोन मुलांना शिकवित आहेत. यातील गोरख या आईविना पोरक्या असलेल्या होतकरू विद्यार्थ्याने कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात शिक्षण घेत वैद्यकीय शिक्षणातील ‘नीट’ या प्रवेश पात्रता परिक्षेत ५०५ गुण घेतले. वाढत्या स्पर्धेत त्याचा सोलापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु, खायचे अन् तालुक्याला ‘फॉर्म’ भरायला जायचे वांदे असलेल्या गोरखपुढे मेडिकल प्रवेशासाठी लागणारे साडेचार लाख रुपये कोठून आणायचे? असा प्रश्न पडला. यास्थितीत त्यांनी आपल्या प्रवेशाचा विचार सोडून दिल्यात जमा होता.

गोरखचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले जात होते. नेमक्या याच वेळी ‘लोकमत’ने आर्थिक स्थितीमुळे होतकरू व गुणवंत गोरखचा प्रवेश अंधातरी झाल्याचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करून समाजमनाला साद घातली होती. या वृत्ताची संबंंध राज्यभरात दखल घेतली गेली. दिवसभर अनेक लोक गोरखशी संपर्क करत होते. समाजातील अनेक दानशुरांचे मदतीसाठी हात पुढे सरसावले. फुल ना फुलाच्या पाकळी स्वरूपात आर्थिक मदत जमा होवू लागली. कोणी थेट भेटीअंती तर कोणी बँक खात्यात मदत जमा केली. यासाठी त्याच्या प्रवेशासाठी तन, मन, धनाने झटणारी जिल्हा परिषद शाळेतील राजेंद्र बिक्कड व महादेव खराटे ही जोडी अहोरात्र लोकांच्या संपर्कात होती. अखेर जमा झालेली रक्कम व शब्द दिलेल्या रक्कमेच्या आधारावर हातउसने केलेल्या पैशावर गोरखचा सोलापूर येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये  ‘एमबीबीएस’साठी प्रवेश ‘कन्फर्म’ झाला आहे.

मदतीसाठी सरसावले हात...
गोरखची व्यथा लोकमतमधून प्रसिद्ध होताच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी १ लाख ५१ हजाराची मदत जाहीर केली होती. रविवारी सकाळी परळी येथील गोपीनाथ गडावर या रक्कमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे ही मदत देण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. भारत खराटे यांनीही सर्वतोपरी अशी मोठी मदत केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर यांनी तसेच भाजपा नेते  डॉ. प्रतापसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांनीही प्रत्येकी २५ हजाराची मदत दिली. कळंब येथील मोहेकर महाविद्यालयाने ५० हजाराची मदत दिली आहे. याशिवाय थेट खात्यावर राज्यातील कानाकोप-यातून यथाशक्ती मदत आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कळंब येथील बालरोगतज्ञ डॉ. रमेश जाधवर गोरखच्या शैक्षणिक काळात इतर खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये देणार आहेत.

माझा अनिश्चित असलेला मेडिकल प्रवेश आता निश्चित झाला आहे. याचा मला खूप मोठा आनंद आहे. ‘लोकमत’ने माझी व्यथा मांडली नसतील तर मला हा पल्ला गाठता आला नसता. त्यांच्यामुळेच माझ्या मदतीसाठी राज्यभरातून अनेकांचे हात पुढे आले. त्यामुळे ‘लोकमत’चे मी आभार मानतो. सोबतच सर्व मदतगारांचेही ऋण व्यक्त करतो. 
-गोरख मुंडे, विद्यार्थी.

 

Web Title: Gorakh's dream of becoming a doctor can be realized through donor donations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.