curfew in Tuljapur will finished on tuesday | तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे

तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे

तुळजापूर : नगरपालिकेच्या वतीने शहरात दि. २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सहा दिवसानंतर म्हणजेच  दि. २८ सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष  सचिन  रोचकरी यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर दिली. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी व व्यापारी यांची उपस्थिती होती.

दि. २८ सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयात शहरातील व्यापारी व पत्रकारांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मुख्याधिकारी आशिष लोकरे म्हणाले की, मागील सहा  दिवस  व्यापाऱ्यांनी  व शहरवासीयांनी जनता कर्फ्यू पाळून सहकार्य केले. त्यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे. यापुढे देखील कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स यांचे कडक नियम पाळावेत.  जे ग्राहक मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करणार नाहीत त्यांना माल देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मागील सहा दिवसात शहरात फक्त ३२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार २९ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू मागे घेण्यात येत आहे. मंगळवारपासून व्यापाऱ्यांनी सकाळी ९ ते ५ या कालावधीत आपली दुकाने उघडावीत, असे आवाहन केले. भविष्यात जनता कर्फ्यूची गरज भासल्यास व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन जनता कर्फ्यू लावला जाईल, असे नगराध्यक्ष रोचकरी यांनी सांगितले.

शासनाच्या निर्देशानुसार नवरात्रोत्सवाचा निर्णय

व्यापारी प्रतिनिधींनी बैठकीदरम्यान आगामी नवरात्राबद्दल विचारणा केली. यावर राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याचे पालन नगर पालिका करेल, असे मुख्याधिकारी लोकरे यांनी सांगितले. श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न विश्वस्त म्हणून आपण व आमदार राणा जगजितसिंह पाटील करीत आहोत. परंतु, राज्य सरकारच्या आदेशानंतरच तुळजाभवानी मंदिर उघडले जाईल, असे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले.

Web Title: curfew in Tuljapur will finished on tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.