फूड भी, मूड भी... गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना जापनीज अन् फ्रेंच ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:55 AM2022-04-27T11:55:51+5:302022-04-27T12:00:08+5:30

गोव्यात गेल्यावर 'प्युअर व्हेज' मंडळींनाही हटके पदार्थ ट्राय करायचे असतील आणि आरामात खुर्चीवर बसून मॉकटेल्सचा आनंद घेता-घेता गोव्यातल्या रस्त्यांवर भ्रमंतीचा असा अनुभव घ्यायचा असेल तर 'चलो पणजी'. तिथे एक नवं कोरं भन्नाट रेस्टॉरंट आपली वाट बघतंय. कोणतं आहे हे रेस्टॉरंट.. वाचा पुढे

Vedro restaurant in Goa Panaji offers you best traditional govan food with French and Japanese twist | फूड भी, मूड भी... गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना जापनीज अन् फ्रेंच ट्विस्ट

फूड भी, मूड भी... गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना जापनीज अन् फ्रेंच ट्विस्ट

googlenewsNext

गोवा म्हणजे बीचेस, गोवा म्हणजे धम्माल, गोवा म्हणजे भटकणं, खाणं, पिणं, गाणं आणि एकदम रिलॅक्स, रिफ्रेश होणं. यातलं 'खाणं-पिणं' म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे काय आलं असेल, हे वेगळं सांगायला नको. एखादा शाकाहारी तरुण गोव्याला जाणार असल्याचं सांगतो, तेव्हा त्याच्याकडे बहुतांश लोक अगदी केविलवाण्या नजरेनं बघतात. कारण, गोवा म्हणजे मासे, मदिरा आणि मज्जा असं एक अलिखीत समीकरण झालंय. पण, 'प्युअर व्हेज' मंडळींनाही हटके पदार्थ ट्राय करायचे असतील आणि आरामात खुर्चीवर बसून मॉकटेल्सचा आनंद घेता-घेता गोव्यातल्या रस्त्यांवर भ्रमंतीचा असा अनुभव घ्यायचा असेल तर 'चलो पणजी'. तिथे एक नवं कोरं भन्नाट रेस्टॉरंट आपली वाट बघतंय. 

पणजीत कुठे? तर वेड्रो रेस्टॉरंटमध्ये! या रेस्टॉरंटचं इंटेरियर डिझाईन केलंय सुझॅन खानने. प्रवेशद्वारातून आत जाताच तुम्हाला दिसतील भिंतीवर रेखाटलेली अन् कुंड्यांमध्ये सजलेली ताडाची झाडं, वेताच्या खुर्च्या, मॅक्रेमचे झुंबर (विणण्याएवजी दोरखंड गाठींनी बांधुन केलेली कलाकृती) ज्यातून मंद प्रकाश दगडाच्या डायनिंग टेबलवर अन् आरामदायी सोफ्यांवर पडतो. तागाचे गालिचे, छान सजवलेली काटेरी झुडपं, जाड मेणबत्त्या, सुकलेली झाडाची फांदी या सौंदर्यात आणखी भर टाकते.  या रेस्टॉरेंटच्या प्रकाशयोजनेत चार चाँद लावलेयत ते निओन रंगांच्या प्रकाशाने सजलेल्या शब्दांनी. 'एसेंट्रीसीटी इज एकंरेज्ड' (‘Eccentricity is encouraged’) असे हे शब्द. नवीन प्रयोगांना प्रेरणा दिली जाते असा त्याचा अर्थ. रेस्टॉरंटचा मेन्यू नेमका असाच आहे. मोजके पदार्थ असलेला अगदी चार पानी मेन्यु पण खवय्यांचं समाधान कित्येक पानं लिहूनही पूर्ण होणार नाही. कारण, येथील पदार्थ आहेत भारतीय पारंपरिक पण बनवण्याची पद्धत फ्रेंच आणि जापनीज. 

रोबोटो आणि सोलो दे गोवा यासारख्या गोव्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट्समधुन आलेल्या माया लाईफंगबम आणि संचित बेहल या जोडीने ओळखलं की, पणजीच्या रेस्टॉरंटमधून गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा सुवास तर दरवळतो, पण पारंपरिक खाद्यसाहित्याला अपरंपारिक ट्विस्ट देण्याची मजा खवय्यांना अधिक आकर्षित करेल. मग काय त्यांनी वेड्रो मधील खाद्यप्रयोगशाळेत म्हणजेच किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग करत खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवयाची जय्यत तयारी केली.

त्यातूनच जन्माला आली वेड्रोमधील 'भुट्टा' ही डिश. आता हिंदीमध्ये मक्याला भुट्टा म्हटले जाते. मराठीत भुट्टा म्हणजे भाजलेलं मक्याच कणीस. मग या पारंपरिक प्रसिद्ध खाद्यपदार्थाला या जोडीने जापनीज ट्वीस्ट दिला. मिसो सिझनिंग तसेच अन्य सामग्रीसोबत मक्याला तीन प्रकारे शिजवले आणि एकाच थाळीत सर्व केले. हा पदार्थ या रेस्टॉरंटची स्पेशल डिश आहे. 

यासोबतच ट्रफल आणि पालकाचा समावेश असलेला पदार्थ म्हणजेच Truffle and Spinach 8 layer lasagne तसेच Pulled raw Jack fruit and plantain puree हा फणसाचा समावेश असणारा पदार्थ हेही या रेस्टॉरंटचे खास पदार्थ आहेत. गोव्यातल्या उकाड्यात घशाला थंडावा हवाच, म्हणून नॉट सो ब्लडी मेरी हे पेरूपासून आणि माल्टा या फळांपासून तयार केलेले मॉकटेल तसेच कलिंगड, पुदिना, माल्टा, ,स्प्राईट यापासून तयार झालेले वॉटरमेलन कुलर तुम्हाला थंड करायला आहेच. 

अगदी कोणाला अंदाजही लागणार नाही असा या रेस्टॉरंटच्या नावाचा अर्थ आहे. कारण काहीतरी नवीनच करायचं हे त्यांनी ठरवलंय. वेड्रो हा रशियन शब्द आहे अन् त्याचा अर्थ होतो बादली. 

त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जायचा प्लॅन असेल तर वेळ न दवडता पणजीत पोहोचा आणि अल्टिन्होतील वेड्रोला भेट द्या. एकसुरीपणाला फाटा देत एका नव्या खाद्यविश्वाची सफर तुम्हाला इथे घडेल. थोडा खिसा सैल सोडावा लागेल, हे खरं. पण, तो पैसा वसूल अनुभव असेल हे नक्की.

Web Title: Vedro restaurant in Goa Panaji offers you best traditional govan food with French and Japanese twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.