जगभर : विमानात लग्न करण्यासाठी जोडप्यांच्या उड्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:20 AM2021-06-07T07:20:04+5:302021-06-07T07:20:42+5:30

तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं.

Around the world: Couples jump on the plane to get married! | जगभर : विमानात लग्न करण्यासाठी जोडप्यांच्या उड्या!

जगभर : विमानात लग्न करण्यासाठी जोडप्यांच्या उड्या!

Next

कोरोनाकाळात सर्वाधिक नुकसान झालं असेल तर ते जगभरातील विमान कंपन्यांचं. कारण कोरोनामुळे सर्वच देशांतील विमानसेवा अचानक ठप्प झाली आणि सगळ्याच विमानांना आहे तिथे एका जागीच उभं राहावं लागलं. त्यामुळे विमान कंपन्यांना प्रचंड तोटा झाला. हा तोटा भरून निघण्यासारखा नव्हता. त्यामुळे असंख्य कंपन्या अक्षरश: डबघाईला आल्या. त्यातून त्या बाहेर पडू शकतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं.

या विमान कंपनीनं आपल्या उभ्या असलेल्या विमानांचं चक्क मंगल कार्यालयात रूपांतर केलं असून, इच्छुक वधू-वरांना थेट ही विमानंच भाड्यानं द्यायला सुरुवात केली आहे. विमानात लग्नासाठी इच्छुकांना फक्त १.५६ मिलियन येन (साधारण साडेदहा लाख रुपये) द्यावे लागतील. मोजक्या म्हणजे तीस पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न लावता येईल. पण नुसतं लग्नच नाही, तर त्यासाठीची सारी तयारीही विमान कंपनीच करून देणार आहे. म्हणजे लग्नाच्या वेळी विमानात लाइव्ह म्युझिक असेल, खाण्यापिण्याची सोय असेल, लग्नानंतर संपूर्ण वऱ्हाडालाच विमानातून छोटी हवाईफेरीही मारता येईल. कोरोनाच्या काळात लग्न  रखडलेल्या आणि साधेपणानं लग्न कराव्या लागणाऱ्या तरुणाईला ही आयडिया चांगलीच पसंत पडली असून, त्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे.  

‘एएनए’ या विमान कंपनीनं मे महिन्याच्या अखेरीस ही योजना सुरू केली असून, मर्यादित कालावधीसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. १३ जूनपर्यंत ही सेवा सुरू राहील असं निदान पहिल्या टप्प्यात तरी कंपनीनं जाहीर केलं आहे. बोईंग बी-७७७ या जेट विमानात सध्या ही लग्नं लावली जात आहेत.ऑल निप्पोन एयरवेज कंपनीकडे लहान मोठी मिळून तब्बल २३९ विमानं आहेत. कोरोनामुळे त्यातील ९० टक्के विमानं सध्या एअरपोर्टवरच उभी आहेत. त्यामुळे कंपनीला रोज प्रचंड तोटा होतो आहे. हा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, जपानमध्ये मे आणि जून हा लग्नाचा मोसम असतो. ज्यांना आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं असं वाटतंय, त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्यासाठीही हा फायद्याचा सौदा आहे. दोन्ही बाजूंकडून त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न होतो आहे.  

२३ मे २०२१ रोजी कंपनीच्या विमानात बिझिनेस क्लास डेकमध्ये पहिलं लग्न झालं. तोरू आणि मामी मुराकामी हे टोकियोमधलं पहिलं दाम्पत्य, ज्यांनी या योजनेचा सर्वांत आधी फायदा घेतला आणि विमानात लग्न करून ते संस्मरणीय बनवलं. या दाम्पत्याचं म्हणणं होतं, कोरोनामुळे सगळं काही बंद असल्यामुळे आम्ही अगदी साधेपणानं; केवळ काही फोटो काढून लग्न करायचं ठरवलं होतं, पण विमान कंपनीची ही अफलातून ऑफर ऐकल्याबरोबर आम्ही अक्षरश: उडी मारून ही संधी साधली.  

जपानमध्ये मे आणि जूनमध्ये अक्षरश: लाखोंच्या संख्येनं लग्नं होतात, पण सध्या कोरोनामुळे बहुतांश  कार्यालयं बंद आहेत. जे खुले आहेत, तिथेही मोठ्या संख्येनं लोक एकत्र येताहेत. ही गर्दी टाळण्यासाठी आणि आपलं लग्न संस्मरणीय व्हावं यासाठी तरुणाईलाही विमानातल्या लग्नाचा हा पर्याय चांगलाच भावला आहे. गेल्या केवळ एक आठवड्यातच वीसपेक्षा जास्त लग्नं विमानात लागली आहेत.  
एएनए विमान कंपनीनं लग्नांसाठी दोन पर्याय दिले आहेत. विमानात लग्न, छोटेखानी समारंभ, जेवण, वऱ्हाडाला हवाई ट्रिप यासाठी १.५६ मिलियन येन आकारले जात आहेत, तर यशिवाय तुम्हाला इंटरनॅशनल टर्मिनल बिल्डिंगमध्ये पार्टीही ठेवायची असेल आणि लग्न समारंभ अधिक दणक्यात साजरा करायचा असेल तर त्यासाठी मात्र तीन मिलियन येन  द्यावे लागतील. 

तोटा कमी करण्यासाठी कंपनीनं आणखी एक उपक्रम सुरू केला आहे. उभ्या असलेल्या विमानांच्या माध्यमातून थोडा फार तरी महसूल मिळावा यासाठी कंपनीनं आता आपल्या एअरबस ए- ३८० या डबल डेकर पॅसेंजर जेटमधून प्रवाशांसाठी ‘साइट सिइंग’ही सुरू केले आहे. 

पायलटच्या हस्ते विवाहाचं प्रमाणपत्र
विमानातील या लग्नाचा कालावधी साधारण साडेतीन तासांचा आहे. यात प्रत्यक्ष लग्न, वऱ्हाडींसाठी भोजन समारंभ, म्युझिक, लायटिंग, रिसेप्शन, वऱ्हाडींना हवाई सैर.. इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या विवाहादरम्यान एक पायलट आणि दोन क्रू मेंबर्सही उपस्थित असतात. ते पाहुण्यांचं आगतस्वागत तर करतातच, पण लग्न लागल्यानंतर पायलटच्या हस्ते दाम्पत्याला विवाहाचं प्रमाणपत्रही दिलं जातं.

Web Title: Around the world: Couples jump on the plane to get married!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.