जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:15 AM2021-06-08T08:15:08+5:302021-06-08T08:15:29+5:30

कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला.

All over the world: Millions of employees want a 'village' home! | जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर!

जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर!

Next

कोरोनाकाळात जगभरातील लाखो उद्योगधंदे आणि विशेषत: मजूरवर्ग देशोधडीला लागला, तरी काही वेगळ्या आणि चांगल्या गाेष्टीही कोरोनामुळे घडून आल्या. प्राप्त परिस्थितीत जगण्याचे आणि उद्योगधंदे काही प्रमाणात का होईना सुरू ठेवण्याचे नवे मार्ग कोरोनानं दाखवले. त्यामुळे जगभरात मोठा बदल घडून आला आणि येत्या काळात आता  लोकांची ती गरजही झाली आहे. कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला.

तंत्रज्ञानाचा हा हात जर लोकांच्या मदतीला नसता तर अख्ख्या जगभर आणखी हाहाकार माजला असता. वर्क फ्रॉम होममुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नुसत्या नोकऱ्याच टिकून राहिल्या नाहीत, तर उद्योगधंद्यांनाही आधार मिळाला. ज्या उद्योगांना असा आधार मिळाला नाही, ते जवळपास डुबले आणि कर्मचारीही बेकार झाले. कोरोनामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे मोठ्या शहरांवरचं अवलंबित्व कमी झालं. आपली कंपनी, आपल्या कंपनीचं ऑफिस मोठ्या शहरांत, अवाढव्य आणि चकाचकच असण्याची गरज नाही, हे उद्योगांना लक्षात आलं. नोकरीसाठी आपलं घरदार सोडून मोठ्या शहरातच आलं पाहिजे यासाठीची कर्मचाऱ्यांची ओढही कमी झाली. मोठ्या शहरांवरील  ताण त्यामुळे कमी होणे आणि छोट्या शहरांना उठाव मिळणे ही नवी वाट त्यातून दिसली. तिथे घरबांधणीचा उद्योग प्रचंड प्रमाणात वाढला.

अमेरिकेत तर छोट्या शहरांतील घरबांधणीत जणू क्रांतीच झाली. छोट्या शहरांमध्ये घरांची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक लोकांनी मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरात राहाणं अधिक पसंत केलं. त्यात गृहकर्जाचे व्याजदरही मोठ्या प्रमाणात कमी झाले. या संधीचा फायदा सर्वसामान्य लोकांनी घेतला. त्यामुळे २००६नंतर प्रथमच छोट्या शहरांत प्रचंड मोठ्या प्रमाणात नव्या घरांचे बांधकाम सुरू आहे. त्याचवेळी मोठ्या शहरांत जागाटंचाई आणि कच्चा माल व मजुरीच्या दरात वाढ झाल्याने घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.  
लॉकडाऊनमुळे आणि घरून काम करण्याच्या सुविधेमुळे ऑफिसच्या जवळ आपलं घर असलं पाहिजे ही कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि गरजही बदलली. त्याचं आकर्षण कमी झालं. अमेरिकेतील ‘नॅशनल होम बिल्डर्स असोसिएशन’च्या माहितीनुसार लोकांचे पगार कमी झालेले असले, तरी छोट्या शहरांत गेल्यावर्षीच्या तुलनेत घरांची मागणी वाढली आहे.

जवळपास १५ टक्के नवीन घरं बांधली गेली आहेत, काहींचं काम सुरू असून, अल्पावधीतच ती पूर्ण होतील. मोठ्या शहरांतही गृहनिर्माण उद्योग वाढतो आहे; पण त्याचं प्रमाण कमी आहे. गृहनिर्माण क्षेत्रात २००६ नंतर प्रथमच एवढी मोठी तेजी आली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत १७ लाख ‘सिंगल फॅमिली होम’ तयार झाले होते. मात्र त्यावेळी घरांची कृत्रिम टंचाई आणि गरजेपेक्षा जास्त घरबांधणी झाल्यामुळे लगेच हा फुगाही फुटला होता. गृहनिर्माण क्षेत्रच गोत्यात आलं होतं. अमेरिकन बिल्डर्सनी या वर्षात मात्र आतापर्यंत ११ लाख ‘सिंगल फॅमिली होम्स’ची निर्मिती केली आहे. येत्या काही महिन्यांत घरांची मागणी आणि बांधणी आणखी वाढेल. 

जागतिक महामंदीच्या काळात संपूर्ण गृहनिर्माण उद्योगच डबघाईला आल्यानं बिल्डरांनी ताकही फुंकून पिताना घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर बंद केली होती. त्याचाही फटका बसला. गव्हर्नमेंट हाऊसिंग लोन कंपनी फ्रेडी मेक यांच्या अंदाजानुसार अमेरिकेत गेल्यावर्षीच, म्हणजे २०२०च्या अखरेपर्यंत मागणीपेक्षा तब्बल ३८ लाख घरांची कमतरता होती. पहिल्यांदाच घर घेत असणाऱ्या तरुण वर्गाला त्याचा मोठा फटका बसला हाेता. इच्छा असूनही लोकांना घरं मिळत नव्हती. ती कमतरता आता यंदा भरून निघते आहे.  
कोरोनामुळे छोट्या शहरांत तुलनेनं छोटी कार्यालये असण्याची गरज जगभरात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे लोकांचा ओढाही आता आपल्या ‘गावाकडे’, छोट्या शहरांकडे वाढला आहे. मोठमोठ्या शहरांतील मोठ्या कार्यालयांची गरज ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कमी झाल्याने कंपन्यांचाही पैसा खूप मोठ्या प्रमाणात वाचतो आहे. हा वाचलेला पैसा काही कंपन्या कर्मचाऱ्यांवरही खर्च करीत आहेत. 

वीस टक्के लोकांचं घरातच ऑफिस!
कोरोनामुळे जगभरातल्या आर्थिक संरचनेतच बदल झाला. कॅलिफोर्निया आणि इतर अनेक शहरांतून लोक, कर्मचारी निघून गेले होते. ज्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा मिळालीय, त्यातील बहुतांश कर्मचारी आता पुन्हा मोठ्या शहरांत येणार नाहीत. एका नव्या अभ्यासानुसार किमान वीस टक्के कर्मचारी आता पुन्हा त्यांच्या मुख्यालयात किंवा त्या शहरात राहायला येणार नाहीत. कारण ते घरूनच काम करतील! त्यामुळे ज्या ठिकाणी ते राहतात, जिथे त्यांचं कुटुंब आहे, अशा छोट्या शहरांतील घरांची मागणी वाढते आहे. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच सुगीचे दिवस दिसत असल्याने बिल्डर लॉबीही आनंदी झाली आहे.

Web Title: All over the world: Millions of employees want a 'village' home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.