ईएसआयसी कार्यालयात कामगारांवर होणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:14 AM2020-10-01T03:14:58+5:302020-10-01T03:15:22+5:30

पनवेलमध्ये सेवा केंद्र; राज्याचे ईएसआयसीचे प्रमुख प्रणय सिन्हा यांच्या हस्ते उद्घाटन

Workers will be treated at the ESIC office | ईएसआयसी कार्यालयात कामगारांवर होणार उपचार

ईएसआयसी कार्यालयात कामगारांवर होणार उपचार

Next

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील महाराष्ट्र कामगार राज्य विमा महामंडळामध्ये नोंदणीकृत कामगारांना आरोग्य सुविधेसाठी करावी लागणारी धावपळ आता कमी होणार आहे. जिल्ह्यातील शाखा कार्यालयातच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्याने कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेलमधील कारंजाडे नोडमध्ये दुधे विटेवरी या इमारतीतील कार्यालय व आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे ईएसआयसीचे क्षेत्रीय निदेशक प्रणय सिन्हा यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

यापूर्वी रायगड जिल्ह्यात एकमेव ईएसआयसीचे कार्यालय पनवेलमध्ये सुरू होते. कामगारांचे विविध प्रश्न या ठिकाणाहून मार्गी लावले जात होते. मात्र प्राथमिक स्वरूपाच्या आजारांवर कामगार वर्गाला इतर रुग्णालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यातून कामगारांची मुक्तता झाली असून, दुधे विटेवरी या ठिकाणी हे कार्यालय व डिस्पेन्सरी अशा स्वरूपात कामकाज सुरू झाले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून १० हजारांपर्यंतचा खर्च कामगारांना देण्याचा अधिकार असणार आहे. पूर्वी या प्रक्रियेसाठी मोठा कालावधी लागत असे. आता एकाच कार्यालयात सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.
या सेतू केंद्राच्या उद्घाटनावेळी सिन्हा यांनी आनंद व्यक्त करताना पनवेलमध्ये ईएसआयसीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ईएसआयसीचे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रीय निदेशक प्रणय सिन्हा, मेघा आयरे, दत्ता कांबळे, राजशेखर सिंग, सचिन ताजवे आदींसह ईएसआयसीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दवाखान्याचे जाळे राज्यभर पसरविणार’
राज्यात कामगार वर्गाला जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी पनवेलच्या धर्तीवर उभारले जाणारे शाखा कार्यालय तसेच दवाखान्याचे जाळे राज्यभर पसरविण्याचा मानस या वेळी ईएसआयसीचे क्षेत्रीय निदेशक प्रणय सिन्हा यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Workers will be treated at the ESIC office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.