शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आता कशाला हवे सर्वेक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:47 AM2020-09-26T00:47:03+5:302020-09-26T00:47:15+5:30

संतप्त नागरिकांचा स्वयंसेवकांना सवाल : ‘माझे कुटुंब...’चा सर्व्हे करताना घरोघरी अपमान

Why a survey now that hundreds of patients have died? | शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आता कशाला हवे सर्वेक्षण?

शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आता कशाला हवे सर्वेक्षण?

Next

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राबवण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत कल्याण- डोंबिवलीतील सोसायट्या, कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्य करणाºया मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये उदासीनतेची भावना आहे. येणारे स्वयंसेवक हेच आपल्याला कोरोनाची लागण होण्यास कारणीभूत ठरणार नाही ना, आमची तब्येत उत्तम असताना अनेकांनी वापरलेली आॅक्सिमीटर आम्ही का वापरायचे, आतापर्यंत शेकडो व्यक्तींचे मृत्यू झाल्यावर आता हे सर्वेक्षण कशाला, अशा अनेक प्रतिक्रिया कानावर येत आहेत.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत महापालिका हद्दीत ४० हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत चार लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.


ही मोहीम राबवणाºया एका स्वयंसेविकेने सांगितलेला अनुभव असा की, तिला अगोदर सोसायट्यांचे सुरक्षारक्षक हटकतात. कशासाठी आला, कुठून आला, कोणी पाठविले अशा प्रश्नांची सरबत्ती झेलल्यावर सुरक्षारक्षकाचे समाधान झाले, तर सोसायटीत प्रवेश मिळतो. बरेचदा सेक्रेटरी, चेअरमन वगैरे पदाधिकारी सहकार्य करीत नाहीत. त्यानंतरही सर्वेक्षणाची संधी मिळाल्यास दुपारच्या वेळी कुठल्याही सोसायटीत गेल्यावर सकाळपासून कामे आटोपून सिरीयल पाहणाºया किंवा वामकुक्षी घेत असलेल्या गृहीणी दारावरची बेल वाजवली तरी अनेकदा दार उघडत नाहीत.
काही गृहिणी दार उघडण्यापूर्वीच अनेक प्रश्न करतात व समाधान झाले नाही तर दार उघडत नाहीत. समजा दार उघडले तर आत्ताच तुम्हाला वेळ मिळाला का? कशाला आमची झोपमोड करायला आला? असे संतप्त शेरे कानावर पडतात.


अनेकदा तुम्ही सर्वेक्षण करणारेच आमच्याकडे कोरोना घेऊन याल, कारण तुम्ही कुठेकुठे फिरत असता, अशी टिप्पणी केली जाते. कोरोनाच्या सर्वेक्षणाची माहिती सांगितल्यावर कुटुंबीयांचे आजार व इतर माहिती द्यायला अनेकजण फार उत्सुक नसतात. किती वेळा सर्वेक्षण करणार आहे? आमची सगळी माहिती घेऊन एखाद्या खाजगी कंपनीला हा डेटा विकणार का? असा प्रतिसवाल केला जातो, अशी माहिती या स्वयंसेविकेने दिली.
आशा स्वयंसेविकांचा बहिष्कार
राज्यात ७० हजार आशा स्वयंसेविका असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे आरोग्य सर्वेक्षण करुन घेतले आहे. कोरोनाकाळात त्यांनी सर्वेक्षणाचे काम केले आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार न करता त्यांच्यावर सर्वेक्षणाची कामे लादली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेकरिता ५० घरांचे सर्वेक्षण केल्यावर १०० रुपये मानधन देणार आहेत. मानधनाची रक्कम तुटपुंजी असल्याने या स्वयंसेविकांनी दोन दिवस काम केल्यानंतर बंद केले, अशी माहिती आशा स्वयंसेविका युनियनचे संयोजक सुनील चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची जनजागृती केली आहे. सुरुवातीला नागरिकांचा नकार होता. आता चांगला प्रतिसाद देत आहेत. आशा स्वयंसेविका चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. ज्या इमारतीत स्वयंसेवकांना रोखले जाते, त्याठिकाणी स्थानिक नगरसेवकाशी संपर्क साधून प्रवेश मिळविला जातो. सोसायट्यांनी सहकार्य करावे, असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. - डॉ. पूर्णिमा ढाके, वैद्यकीय अधिकारी, मढवी आरोग्य केंद्र, केडीएमसी

सर्वेक्षणाच्या विरोधात सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल करणाºया महिलेवर गुन्हा दाखल
च्डोंबिवली : सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल करून एका तरूणाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली एका महिलेविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डोंबिवली टिळकनगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चोरीच्या आठ ते नऊ घटना घडल्या असून महापालिकेचे बनावट ओळखपत्र परिधान करून काही व्यक्ती फिरत असून त्यांच्याकडून या घटना घडत आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांना काळजी घ्या, असे आवाहन करणारी पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर २१ सप्टेंबरपासून व्हायरल झाली आहे. यात एका १८ वर्षीय मुलाचा फोटो टाकण्यात आला होता. मात्र स्थानिक टिळकनगर पोलीस ठाण्यात कोणतीही चोरीची तक्रार अथवा गुन्हा नोंद नव्हता.
च्त्यानंतर आता असा उलगडा झाला आहे की, या परिसरात केंद्र सरकारच्या वतीने एका एजन्सीच्या माध्यमातून आर्थिक सर्वेक्षण सुरू आहे. त्याकरिता काही तरूण घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. व्हायरल झालेल्या पोस्टमधील तरूणाचा फोटो हा आर्थिक जनगणनेचे काम करणाºया तरुणांपैकी एक असल्याची माहिती संबंधित एजन्सीला मिळताच त्यांनी थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठत चुकीचा संदेश व्हायरल करून बदनामी करणाºया महिलेविरोधात त्या तरूणाने दाखल केलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Why a survey now that hundreds of patients have died?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.