Where to place KDMT buses? Part of the theft is due to the bus being parked on the road | केडीएमटीच्या बस ठेवायच्या तरी कुठे?; रस्त्यावर बस उभ्या केल्याने पार्टची होतेय चोरी
केडीएमटीच्या बस ठेवायच्या तरी कुठे?; रस्त्यावर बस उभ्या केल्याने पार्टची होतेय चोरी

कल्याण : बसचालक आणि वाहकांची कमतरता आणि उत्पन्न-खर्चातील वाढती तफावत, यामुळे गणेशघाट आणि वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे आगारात केडीएमटीच्या ११६ बस धूळखात पडल्या आहेत. परिणामी, सध्या चालू असलेल्या बस ठेवण्यासाठी आगारात जागा उरलेली नाही. त्याचा फटका बसच्या सुरक्षेला बसला असून, रस्त्यावर उभ्या केलेल्या बसचे पार्ट चोरीला जाऊ लागले आहेत.

केडीएमटीच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० व जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारांतील ११८ अशा एकूण २१८ बस आहेत. यापैकी दोन बस अपघातग्रस्त झाल्याने सध्या २१६ बस उपक्रमाच्या ताफ्यात आहेत. परंतु, बसचे आयुर्मान, आगारातील उपलब्ध मूलभूत सोयीसुविधा, आयुर्मान ओलांडलेल्या जुन्या बसच्या दुरुस्तीसाठी येणारा वाढीव खर्च, दिवसागणिक प्रवासीसंख्येत होणारी घट, यामुळे वाढत जाणारी संचालन तूट पाहता उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.

२१८ बसचा ताफा असला, तरी सध्या ७० बसच रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बस या आगारांमध्ये धूळखात पडल्या असून, यात आगारातील जास्तीतजास्त जागा या बसगाड्यांनी व्यापली आहे. यात ४७ भंगार बससह लिलावासाठी प्रस्तावित असलेल्या ६९ बसचा समावेश आहे.

गणेशघाट आगारातूनच सध्या सर्व बसचे संचालन केले जात आहे. परंतु, त्यात केडीएमसीने या आगारातील दोन गुंठे जागेत अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. परिणामी, संचालन सुरू असलेल्या बस आगारात उभ्या करण्यासाठी जागा राहिलेली नाही. हीच अवस्था वसंत व्हॅली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे आगाराची आहे. तर, डोंबिवलीतील खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करण्यात येतात. २००५ च्या महापुरात गणेशघाट आगारातील बसगाड्यांचे मोठे नुकसान झाले होते.

त्यावेळच्या बस आजही भंगार अवस्थेत आहेत. यात इंजीन घोटाळ्यातील बसचाही समावेश आहे. यातील पाच बसवर घोटाळ्याचा ठपका असताना ४७ पैकी ४२ बस अद्यापही आगारात का खितपत ठेवल्या आहेत, असाही सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे. तसेच वाहक आणि चालकांची कमतरता आणि उत्पन्न आणि खर्चातील वाढती तफावत पाहता ६९ बसगाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. याला परिवहन समितीची मान्यताही मिळाली आहे. महापौर विनीता राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या बसगाड्यांची पाहणीही केली होती. परंतु, अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने या बसही आगारात धूळखात पडल्या आहेत.

आगारात आता बस उभ्या करण्यासाठी जागाच न उरल्याने चालू स्थितीतील बस आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. यात बसचे पार्ट चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गणेशघाट आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या बसच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असली तरी रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया बसची सुरक्षा धोक्यात आली आहे. आधीच उपक्रमाची अवस्था बिकट असताना आता बसगाड्यांचे पार्ट सुरक्षेअभावी चोरीला जाऊ लागल्याने उपक्रमाची चिंता अधिक वाढली आहे.

जागा नाही ही वस्तुस्थिती

जुन्या बसगाड्यांमधील भंगारातील बस असो अथवा लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या बसचा मुद्दा असो, याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने त्या गाड्या जैसे थे आगारात उभ्या आहेत. त्यामुळे चालू अवस्थेतील बस जागेअभावी आगाराच्या बाहेर उभ्या कराव्या लागत आहेत. याबाबत केडीएमसीतील पदाधिकारी आणि अधिकाºयांची भेट घेऊन निश्चित तोडगा काढला जाईल, असे केडीएमसीचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले.

Web Title:  Where to place KDMT buses? Part of the theft is due to the bus being parked on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.