थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:53 PM2021-04-13T23:53:19+5:302021-04-13T23:54:10+5:30

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

Wandering for a drop of water, the usual water scarcity in remote areas of Wada taluka | थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

googlenewsNext

- वसंत भोईर

वाडा :  ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. अशीच अवस्था वाडा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी लोकवस्ती असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक पाड्यांतील नागरिकांची झाली आहे. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्याची फक्त आश्वासने मिळालेली आहेत. प्रत्यक्षात आश्वासनांची कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांना होळीनंतर पाऊस पडेपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकत रहावे लागत आहे.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या चारही पाड्यांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील आदिवासींना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.
वाडा तालुक्याला पाच नद्यांची देणगी असूनही या पाण्याचे नियोजन नसल्याने तालुक्यातील अनेक गाव-खेड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील नागरिकांचा पिण्याच्या, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तालुक्यात असलेल्या पाच नद्यांपैकी कुठेतरी एखादे मोठे धरण व्हावे, अशी मागणी तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी केलेली नाही.
वाडा तालक्यातील भूमिपुत्र असलेले दामोदर शिंगडा हे २५ वर्षे खासदार होते, ल. का. दुमाडा हे पाच वर्षे खासदार होते, शंकर आबा गोवारी हे दहा वर्षे आमदार होते; तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा हे ३० वर्षे आमदार होते. यामधील सहा वर्षे ते आदिवासी विकासमंत्रीही होते. वाडा तालुक्याला सध्या दौलत दरोडा, सुनील भुसारा, शांताराम मोरे असे तीन आमदार असताना अनेक गावांमधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल, तर यासारखे दुर्दैव ते कोणते? असा सवाल आदिवासी उपस्थित करू लागले आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असल्याने त्यांचा रोजगार बुडतो.
- गणपत दोडे, माजी सरपंच,
ओगदा ग्रामपंचायत

पाणीटंचाई असलेल्या ओगदा व तुसे परिसरातील काही पाड्यातील नागरिकांची टँकर मागणी आलेली आहे. लवकरच येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.
- विनोद गुजर, 
पाणीपुरवठा विभाग,
पंचायत समिती, वाडा.

Web Title: Wandering for a drop of water, the usual water scarcity in remote areas of Wada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.