खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, गणेशोत्सवाच्या तोंडावर होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:10 AM2020-08-14T01:10:19+5:302020-08-14T01:10:25+5:30

एमएसआरडीसीच्या पुलांवर खड्डे : ठाणे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने सुरू केले रस्त्यांचे सर्वेक्षण

Vehicles blocked by potholes, repairs will be done on the eve of Ganeshotsav | खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, गणेशोत्सवाच्या तोंडावर होणार दुरुस्ती

खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, गणेशोत्सवाच्या तोंडावर होणार दुरुस्ती

Next

ठाणे : कोरोनाच्या सावटामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे ठाणे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे आजघडीला शहरातील कामगार हॉस्पिटल परिसर, माजिवडानाका, कापूरबावडी, कळवा, मुंब्य्रासह इतर भागांतही खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातही, एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील उड्डाणपुलांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावून वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरूकेल्या आहेत.

दरवर्षी पाऊस सुरू झाला की, शहरात खड्ड्यांची समस्या आ वासून उभी राहते. यंदाही ठाण्यातील अनेक भागांत खड्डे पडल्याचे चित्र आहे. परंतु, आता आॅगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने खड्ड्यांची संख्याही जास्त झाली आहे. मात्र, शहरात सध्या किती खड्डे आहेत, त्याची संख्या मात्र पालिकेच्या दफ्तरी उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाची साथ सुरू असून, संपूर्ण यंत्रणा त्याकामी व्यस्त असल्याने याकडे अद्याप लक्ष गेले नसल्याचे बोलले जात आहे. परंतु आता आॅगस्ट उजाडला आणि पावसाचा जोर वाढल्याने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुन्हा महापालिकेच्या कामाची पोलखोल केली आहे.

तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, याचा आराखडा तयार केला होता. त्याचे काय झाले, याचेही उत्तर सध्या महापालिकेकडे नाही.

दुसरीकडे पावसाळ्यापूर्वीच मे महिन्यात नऊ प्रभाग समितीअंतर्गत खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी १५ लाखांची निविदा मंजूर केली होती. त्यानुसार, आता शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. परंतु, यावर पेव्हरब्लॉक हा कायमचा उपाय नसल्याचे सांगितले जात असले, तरी तीनहातनाका ते अ‍ॅपलॅब सर्कल येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी त्याचाच तात्पुरता मुलामा चढविला जात आहे. दुसरीकडे शहरातील माजिवडानाका, कापूरबावडीनाका, कामगार हॉस्पिटल, कळवा आणि मुंब्य्रातील काही रस्त्यांसह शहरातील ज्याज्या भागात डांबरी रस्ते आहेत, त्याठिकाणी खड्डे जास्त पडल्याचे दिसत आहे. परंतु, पाऊस उघडीप घेत नसल्याने ते बुजविण्यात अडचणी येत आहेत. सध्या शहरातील खड्डे कोल्ड मिक्स, डांबर आणि काँक्रिटच्या माध्यमातून बुजविले जाणार आहेत. त्यानुसार, आता सर्व्हे सुरूकेल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेने पत्रव्यवहार करूनही एमएसआरडीसीकडून दुरुस्ती नाही
मागील वर्षीप्रमाणे यंदाही एमएसआरडीसीच्या तीन प्रमुख उड्डाणपुलांवर खड्डे पडलेले आहेत. परंतु, अद्यापही ते बुजविण्यात आलेले नाहीत. तसेच कॅडबरी, नितीन कंपनी आणि तीनहातनाका येथील उड्डाणपुलांवरदेखील खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलांवर सध्या वाहनांच्या रांगा लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी या उड्डाणपुलांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने केले होते. यासाठी ६० लाखांहून अधिकचा खर्चही केला होता. परंतु, तो खर्च मिळाला की नाही, याबाबतही महापालिका साशंक आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पालिकेच्या संबंधित विभागाने एमएसआरडीसीला पत्र पाठवून उड्डाणपुलांवरील रस्त्यांची निगा, देखभाल आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता खड्डे पडल्यानंतरही एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही.

483 जुलै महिन्यात आढळलेले खड्डे
७ जुलै रोजी केलेल्या सर्व्हेत शहरात ४८३ खड्डे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सर्व्हेच झालेला नाही. हे खड्डे १५६४.१ चौरस मीटरचे होते. यातील २७२ खड्डे दुरुस्त केले होते. तर, २११ खड्डे दुरुस्त करायचे शिल्लक होते. सर्वाधिक २३० खड्डे हे दिवा प्रभाग समितीत आणि सर्वात कमी ११ खड्डे लोकमान्यनगर-सावरकरनगरात होते. परंतु, त्यानंतर आता आॅगस्ट महिन्यात पावसाचा वेग वाढल्याने खड्ड्यांचे प्रमाण हे नक्कीच वाढले असेल, असा दावा खुद्द पालिकेने केला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून मे महिन्यात दोन कोटी १५ लाखांची निविदा मंजूर केलेली आहे. त्यानुसार, खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या तीनहातनाका ते अ‍ॅपलॅब सर्कल येथील खड्डे बुजविले जात आहेत. तसेच यंदा कोल्डमिक्स, डांबर आणि काँक्रिटच्या साहाय्याने ते बुजविले जाणार आहेत.
- रवींद्र खडताळे,
नगरअभियंता - ठामपा)

Web Title: Vehicles blocked by potholes, repairs will be done on the eve of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.