येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:26 PM2020-09-29T22:26:42+5:302020-09-29T23:46:03+5:30

गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथकांनी ही शोध मोहीम राबविली.

The three boys, who were stranded in the forest of Yeoor, were rescued after an eight-hour search | येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

पाच पथकांनी घेतले परिश्रम

Next
ठळक मुद्दे पोलीस आणि वनविभागाने घेतला शोधपाच पथकांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१, रा. वसंत विहार, ठाणे), शार्दूल लिंगायत (२१, रा. वसंतविहार, ठाणे) आणि अनिकेत गुप्ता (२१, वसंतविहार, ठाणे) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. रात्रीच्या काळोखात तब्बल आठ ते नऊ तास ही शोध मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे संजय, शार्दूल आणि अनिकेत हे तिघेही मित्र ठाण्यातील वसंत विहार या एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात फिरण्यासाठी आणि गिर्यारोहणासाठी गेले होते. ते दुपारी घरी येणार होते. परंतू, जंगलात आत शिरल्यानंतर परतीचा मार्ग न मिळाल्याने ते आत चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात भरकटले. येऊरच्या धबधब्यापासून जवळच रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी शार्दूल याने त्यांच्या कुटूंबियांना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जंगलात रस्ता चुकलो, असल्याचा मेसेज केला. त्याच आधारे या तिघांच्या पालकांनी चितळसर पोलीस आणि येऊर वनविभागाला ही माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील, पोलीस नाईक सतिश सुर्वे आणि सचिन भंडगर तसेच येऊर परिमंडळ वनअधिकारी विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर क्षेत्र वनअधिकारी राजन खरात, वनरक्षक केशव बनसोडे तसेच काही वनमजूर आणि येऊर गावातील किशोर म्हात्रे यांच्यासह ३० जणांचा गट अशा पाच वेगवेगळया पथकांनी पाच दिशांना या तरुणांचा शोध घेतला. सुरुवातीला शार्दूल याने पाठविलेल्या मेसेजचे लोकेशन वसई मिळाले. त्यामुळे तिकडेही एका पथकाने शोध घेतला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० अशी सलग सात तासांची शोध मोहीम घेऊनही ते मिळाले नाही. एक तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा येऊरच्या दबदब्याच्या दिशेने त्यांचा शोध घेतला त्यावेळी हे तिघेही दबदब्यापासून जवळच पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सुखरुप मिळाले. या तिघांनाही पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले. मुळात, येऊर हे राखीव वनक्षेत्र असल्यामुळे या तिघांनीही वन विभागाची नजर चुकवून बेकायदेशीरपणे आत प्रवेश केला. त्यातच ते भरकटल्यामुळे हा प्रकार घडला. परंतू, ते सुखरुप मिळाल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस, वनविभागाग आणि येऊरच्या ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

 

Web Title: The three boys, who were stranded in the forest of Yeoor, were rescued after an eight-hour search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.