परदेशात निर्यात होणाऱ्या ५५ लाखांच्या मालाचा शहापूरातच अपहार करणा-या त्रिकुटास अटक

By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2020 09:41 PM2020-09-18T21:41:48+5:302020-09-18T21:46:34+5:30

उत्तरप्रदेशातून जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट आणि मण्यांचा ५५ लाखांचा माल जेएनपीटीमध्ये नेण्याऐवजी ठाणे जिल्हयातील शहापूरातच परस्पर अपहार करणा-या ट्रक चालकासह तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी नागपूरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मालही जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Three arrested for embezzling Rs 55 lakh worth of goods exported abroad | परदेशात निर्यात होणाऱ्या ५५ लाखांच्या मालाचा शहापूरातच अपहार करणा-या त्रिकुटास अटक

१० लाखांचा ऐवज केला हस्तगत

Next
ठळक मुद्दे नागपूरातील कारागृहातून ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात १० लाखांचा ऐवज केला हस्तगत जेएनपीटीमध्ये माल नेण्याऐवजी रस्त्यातच ट्रक केला रिकामा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उत्तरप्रदेशातून थेट जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट तसेच मण्यांचा ५५ लाखांचा परस्पर अपहार करणारा चालक मेहफूज कुरेशी (२१)त्याचे साथीदार जफरुल उर्फ जाफर कुरेशी (३५) आणि अजिज मलीक (३०, तिघेही राहणार उत्तरप्रदेश) या तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे दहा लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
मुंबईतील एका ट्रान्सपोर्टचा ट्रक मेहफूज कुरेशी हा चालक उत्तरप्रदेशातून मुंबईत येण्यासाठी १६ जून २०२० रोजी निघाला होता. मात्र, हा ट्रक रिकामा येण्याऐवजी त्यात काही सामान घेऊन येतो, असे त्याने ट्रान्सपोर्टचे मालक त्रिपाठी यांना सांगितले. त्यांनी परवानगी देताच उत्तरप्रदेशातील संदीप पांडे यांचा जपान येथे निर्यात होणारे मणी आणि कारपेट असा ५५ लाखांचा माल त्याने न्हावाशेवा येथील जेएनपीटी बंदरामध्ये (२५ हजारांमध्ये ) नेण्यासाठी भरला. मात्र, हा ट्रक वाटेतच शहापूर भागात परस्पर रिकामा करुन कुरेशी त्याच्या साथीदारांसह पसार झाला होता. रिकामा ट्रक मिळाल्यानंतर पांडे यांनी याप्रकरणी २७ जून रोजी शहापूर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद युनिटचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार सुनिल कदम, पोलीस नाईक अमोल कदम, हनुमंत गायकर आणि सुहास सोनवणे आदींचे पथक करीत होते. त्याच दरम्यान, नागपूरातील पारधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ३५ लाखांच्या चहाच्या अपहाराच्या अशाच गुन्हयात कुरेशीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे नागपूर न्यायालयामार्फतीने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ८ सप्टेंबर रोजी या तिघांचाही ताबा घेण्यात आला. त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत शहापूर न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली. याच कोठडीदरम्यान त्यांनी या ५५ लाखांच्या मालाच्या अपहाराची कबूली दिली. त्यांनी हा माल मालेगाव येथे विक्रीसाठी ठेवला होता. मात्र, नागपूर पोलिसांनी पकडल्यानंतर हा मालही विकता न आल्याचे त्यांनी सांगितले. या मालापैकी दहा लाखांचा माल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित माल आणि त्यांच्या आणखी साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी मेहफूज कुरेशी याच्यासह तिघांनाही ३० सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शहापूर न्यायालयाने दिले. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी त्यांची पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Three arrested for embezzling Rs 55 lakh worth of goods exported abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.