मित्र असलेल्या शिवसेना-भाजपची यावेळी दुश्मनी पाहणार ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:01 PM2020-02-23T23:01:23+5:302020-02-23T23:02:23+5:30

सत्तेत असलेल्या शिवसेनेला अंगावर घेण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा मुद्दा असो किंवा डम्पींग, पाणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या प्रकल्पांचा मुद्दा असो.

Thanekar will see animosity of Shiv Sena-BJP allies this time | मित्र असलेल्या शिवसेना-भाजपची यावेळी दुश्मनी पाहणार ठाणेकर

मित्र असलेल्या शिवसेना-भाजपची यावेळी दुश्मनी पाहणार ठाणेकर

Next

- अजित मांडके, ठाणे

गेली २५ वर्षे मैत्रीत असलेले शिवसेना आणि भाजप हे पक्ष राज्यपातळीवरुन वेगळे झाले आहेत. त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेनेला अंगावर घेण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा मुद्दा असो किंवा डम्पींग, पाणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या प्रकल्पांचा मुद्दा असो. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींवरुन आता भाजपचे नेते थेट शिवसेनेवर वार करताना दिसत आहेत. शिवसेनेकडून तूर्तास पलटवार केला जात नसला तरी शांत बसणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही. त्यामुळे आता पलटवाराची तयारी शिवसेनेने केली आहे. येत्या काळात भाजप हाच विरोधी बाकावर असेल व त्यामुळे हे दोन जुने मित्रपक्ष परस्परांना भिडल्याचे चित्र पाहायला मिळेल.

मागील २५ वर्षे जागा कमी आल्या असतांनाही भाजपने शिवसेनेकडून ठाणे महापालिकेतील हवी ती पदे उपभोगली आहेत. यामध्ये स्थायी समिती सभापतीपद, परिवहन समितीचे सभापतीपद व अन्य काही महत्वाच्या समित्यांचा समावेश आहे. भाजपच्या वाट्याला बऱ्याच वेळेस उपमहापौरपदही आले होते. मात्र २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळी लढली आणि येथूनच शिवसेना विरुद्ध भाजप संघर्षाची ठिणगी पडली. भाजपने या निवडणुकीत पाच नगरसेवकांचे संख्याबळ २३ वर नेले. मात्र विरोधी पक्षनेतेपदाचा मान त्यांना मिळविता आला नाही. राष्ट्रवादीने ३५ जागा जिंकून विरोधी पक्षनेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. शिवसेनेने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्तेची सर्वच सूत्रे बहुमत प्राप्त करुन आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे स्थायी समिती, उपमहापौरपद आणि इतर समित्यांमधूनही भाजप हद्दपार झाली.

याच कालावधीत केंद्र आणि राज्यपातळीवर शिवसेना आणि भाजपने सत्तेची समीकरणे जुळवली. परंतु ठाणे महापालिकेत शिवसेनेने भाजपला जवळ केल्याचे दिसले नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि नाईलाजास्तव ठाण्यात भाजपला शिवसेनेची मदत करावी लागली. वरकरणी युतीचा धर्म निभावत असल्याचे भासवले असले तरी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, त्यांचा प्रचार न करण्यासाठी थेट वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहार करणे, असे प्रकार घडले. त्यावेळी युती ही भाजपची गरज असल्याने वरिष्ठांना मध्यस्ती करुन वाद मिटवला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही युती झाली. मात्र जेथे शिवसेनेचा उमेदवार होता, तेथे भाजपने किंवा जेथे भाजपचा उमेदवार होता, तेथे शिवसेनेने किती मदत केली, हा संशोधनाचा विषय आहे. शिवसेनेकडून मिळणाºया सापत्न वागणुकीमुळे भाजपच्या काही मंडळींमध्ये धुसफुस सुरु होती. याला खरी वाचा फोडली गेली ती महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच. येथूनच राज्यपातळीवरील शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. याचे पडसाद ठाणे महापालिकेत दिसून आले. भाजपने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी ठाण्यातील भाजपची सूत्रे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या खांद्यावर सोपविली. वास्तविक पाहता, डावखरे यांचे नाव विधानसभा निवडणुकीपूर्वीच अंतिम करण्यात आले होते. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यापूर्वीच शिवसेनेच्या विरोधात रणनिती कशी आखली जाणे अपेक्षित आहे, शिवसेनेची कोंडी कशी केली जाईल, सेनेच्या विरोधात जनमानसात चीड कशी निर्माण होईल याचा अभ्यास आधीच झाला होता. परंतु यासाठी भाजप संधीची वाट पाहत होता. ती संधी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमुळे चालून आली आणि आता तर येत्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने शिवसेनेवर शरसंधान साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यापूर्वी ठाणे महापालिकेच्या महासभेत शिवसेना विरुध्द राष्टÑवादी असा संघर्ष होता. आता ही समीकरणे बदलली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादीने गळ््यात गळे घातले आहेत. आमची अगोदर छुपी मैत्री होती, आता आम्ही उघडपणे मैत्री जपतो, अशी कबुली या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जाहीरपणे देत आहेत. परंतु विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीने सोडलेले नाही. कदाचित हे पद भाजपकडे जाऊ नये याकरिता राष्टÑवादी ते सोडणारही नाही. ठाणे महापालिका निवडणुकीत जागावाटपाचे गणित जुळवण्यात महाविकास आघाडीला यश लाभले तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील. समजा गणित जुळले नाही तर परस्परांशी लुटुपुटुची लढाई करुन भाजपला विरोधकांची स्पेस काबीज करण्याची संधी मिळणार नाही, याचा प्रयत्न करतील. भाजपने नेमके हेच राजकारण हेरुन आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. महासभेत विरोधाची तलवार आता भाजपकडूनच उपसली जात आहे. मागील तीन ते चार महासभांमध्ये भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाविकास आघाडीपुढे त्यांचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बोलके नगरसेवक कमी पडले. त्यामुळे इतर नगरसेवकांना बोलते कसे करायचे, शिवसेनेला कोंडीत कसे पकडयाचे याचे नियोजन भाजपकडून सुरु झाले आहे. याचाच एक भाग म्हणून ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळावी, डम्पींगचा प्रश्न सुटावा आदी प्रश्नांवर भाजपने हल्लाबोल केला आहे. अलीकडेच झालेल्या महासभेत शिवसेनेनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या सायन्स पार्क आणि अर्बन जंगल प्रकल्पाचे काम थांबवले. यावर भाजपने चांगलेच तोंडसुख घेत, स्थगिती सरकारच्या प्रमुखांकडून भूमिपुजन झालेला प्रकल्प रद्द करण्याची नामुश्की ओढवल्याची टीका केली. यापुढेही जाऊन क्लस्टरचा घोळ, चुकीच्या पध्दतीने प्रकल्पांना दिलेला निधी, ठाणेकरांना मूलभूत सोईसुविधा मिळाव्यात यासाठी भाजपकडून शिवसेनेवर आगपाखड केली जात आहे. आता शिवसेनेकडून सावधगिरीने पावले उचलली जात आहेत.

यापूर्वी २५ वर्षे शिवसेनेबरोबर सत्तेत असल्याने भाजपला शिवसेनेच्या बºयात चांगल्या आणि वाईट गोष्टी माहित आहेत. त्यातील वाईट गोष्टींचे भांडवल करुन शिवसेनेला सळो की पळो करण्याचा प्रयत्न यापुढे भाजपकडून होणार आहे. शिवसेनेकडून या रणनीतीला कशा पध्दतीने उत्तरे दिली जातील आणि भाजपच्या अडचणी कशा वाढविल्या जातील यासाठी शिवसेना देखील प्रयत्नशील आहे. भाजपचे व्हिजन महापालिका आहे, शिवाय लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाण्यात मतदारांचा वेगळा गट तयार केला आहे, त्याच जोरावर आता शिवसेनेच्या मतांची विभागणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होणार आहेत. ही गोष्ट शिवसेनेलाही माहित आहे, त्यामुळे भाजपच्या मतपेटीला कसा सुरुंग लावायचा व आपल्या हक्काची मते आपल्याकडे कशी राहतील, याची रणनीती सेनेचे नेते आखत आहेत. मागील २५ वर्षे शिवसेना भाजपची मैत्री पाहणाºया ठाणेकरांना आता येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप असा कट्टर विरोधाचा सामना पाहण्याची संधी येत्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

ठाण्यात गेली २५ वर्षे परस्परांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमधील संघर्ष येत्या महापालिका निवडणुकीत ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती झाली तरी ती किती दिखाऊ होती ते साऱ्यांनीच पाहिले होते. ठाणे महापालिका निवडणुकीत सेनेला बहुमत मिळाल्यापासून भाजपची परवड सुरु आहे. यापूर्वी सत्तेचा वाटा मिळणाºया भाजपला ना सत्तेची पदे मिळाली ना विरोधी पक्षाची जागा. येत्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधकाची भूमिका भाजप निभावणार आहे.

Web Title: Thanekar will see animosity of Shiv Sena-BJP allies this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.