ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:03 PM2021-11-08T17:03:30+5:302021-11-08T17:03:52+5:30

लसीकरण मोहीमेला मागील काही दिवसापासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने घेतले महत्त्वाचे निर्णय.

Thane Salary will be stopped if municipal employees do not submit corona vaccination certificate warning of the mayor | ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

googlenewsNext

ठाणे : लसीकरण मोहीमेला मागील काही दिवसापासून प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठाणे महापालिकेने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या  रुग्णांच्या नातेवाईकांना लस प्रमाणपत्र दाखवूनच केसपेपर देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. तर ज्या पालिका कर्मचारी, अधिकारी, हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर आदींना देखील आता लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन थांबविले जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हर घर दस्तक ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार पालिकेचे कर्मचारी, आशा वर्कर, वॉर्ड बॉय आदींसह डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन घरोघरी जाऊन लसीकरणाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी १६७ पथके तयार केली जाणार आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना तत्काळ त्याच ठिकाणी लस दिली जाणार आहे. याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनादेखील अद्यापही लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नसेल त्यांनी आठ दिवसात डोस घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन थांबविले जाणार असून यासाठी ८ दिवसांचा कालावधी त्यांना दिला जाणार आहे.

याशिवाय पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अॅन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. परंतु यापुढे जाऊन आता लस घेतल्याचे प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्याला किंवा त्याच्या नातेवाईंकांना केस पेपर दिला जाणार नसल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु या निर्णयावरुन टीका होऊ शकते, त्यामुळे हा निर्णय विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी देखील लसीकरण करुन घ्यावे यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेबरोबरच बैठक घेऊन त्यांना देखील लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत देखील नागरीकांना लसीकरणासाठी आवाहन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५ लाख ३५ हजार नागरीकांनी अद्याप पहिला डोसही घेतला नाही 
ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या लसीकरणात आतार्पयत ११ लाख ७४ हजार ९९० नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ६९ टक्के एवढे असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही ६ लाख ७५ हजार ७५३ एवढी आहे. त्यानुसार अद्यापही ४ लाख ९९ हजार २३७ नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. परंतु असे असले तरी अद्यापही तब्बल ५ लाख ३५ हजार नागरीकांनी एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंब्रा, राबोडीतही केली जाणार जनजागृती 
ठाणे शहरात लसीकरण मोहीम सुरु असली तरी देखील मुस्लीम बहुल वस्तीमध्ये अद्यापही लसीकरण मोहीमेला हवा तसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. त्यामुळे आता मुंब्रा, राबोडी किंवा अन्य मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली.

Web Title: Thane Salary will be stopped if municipal employees do not submit corona vaccination certificate warning of the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.