कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज; नवीन लाटेची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:48 PM2021-02-23T23:48:44+5:302021-02-23T23:49:15+5:30

नवीन लाटेची भीती : कुलूप बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा चालू करण्याची लगबग

Thane Municipal Corporation is ready to deal with Corona | कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज; नवीन लाटेची भीती

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज; नवीन लाटेची भीती

Next

अजित मांडके

ठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीत कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्कतेच्या दृष्टिकोनातून काही कुलूपबंद केलेले कोविड सेंटर पुन्हा चालू करण्याची लगबग सुरू केली आहे. या ठिकाणी साफसफाई करून ते पुन्हा कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्यात येत आहे. तर आणखी एक नवे कोविड सेंटर येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्याही वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्यामुळे महापालिकेने टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते. परंतु, नव्या वर्षात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

नागरिकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी करणे यामुळेदेखील रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी कोविड सेंटरमध्ये चार हजारांहून अधिक बेड शिल्लक होते. परंतु,  ते बंद केल्याने बेडची संख्याही कमी झाली होती.  सध्याच्या घडीला ११ ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. यातील काही सेंटर बंद होते. तेदेखील आता सुरू करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 

एक नवीन सेंटर  होणार सुरू
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला १० सेंटर सुरू असून भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी एक इमारत सज्ज केली आहे. त्यानुसार ११ कोविड सेंटर सुरू झाली आहेत. तर ज्युपिटर रुग्णालयासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेवर कोविड सेंटर उभारले असून येथे एक हजार १७७ बेड आहेत. येत्या काही दिवसांत हे सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. 
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

ठाणे शहरामध्ये ११ कोविड सेंटर सुरू 
शहरात यापूर्वी पालिकेची आणि खासगी मिळून ३४ कोविड सेंटर सुरू होते. परंतु आता ती संख्या ११ वर आली आहे. त्या ठिकाणी एक हजार ९६९ बेड उपलब्ध असून ८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १७८ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

कोविड सेंटरमध्ये  ६५३ रुग्णांवर उपचार 
महापालिकेच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट हब येथील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला १०७४ बेड उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी सध्या ६५३ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये आयसीयूमध्ये १३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Thane Municipal Corporation is ready to deal with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.