ठाणे पोलिसांना नवीन वाहने मिळाली; गुन्हेगारांची आता खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:09 PM2021-12-07T19:09:36+5:302021-12-07T19:10:04+5:30

पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शहर पोलिस दलाला नविन वाहनांचे वितरण

Thane city police get new vehicles; Eknath shinde, Jitendra Awhad gave it | ठाणे पोलिसांना नवीन वाहने मिळाली; गुन्हेगारांची आता खैर नाही

ठाणे पोलिसांना नवीन वाहने मिळाली; गुन्हेगारांची आता खैर नाही

Next

ठाणे:- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा नियोजन निधीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने देण्यात आली. त्यांचा वितरण सोहळा पालकमंत्री श्री.शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत येथील साकेत पोलीस कवायत मैदानावर झाला. त्यावेळी मंत्री श्री.शिंदे बोलत होते.

यावेळी महापौर नरेश म्हस्के, आमदार गणपत गायकवाड, रईस शेख, ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस सहआयुक्त सुरेश कुमार मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार आदी उपस्थित होते.

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या १३ वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची पत्रे श्री.शिंदे आणि श्री.आव्हाड यांच्या हस्ते यावेळी देण्यात आली.

पालकमंत्री श्री.शिंदे म्हणाले, पोलीस आपली काळजी घेतात आपण देखील त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठलाही सण, उत्सव असो पोलीस सदैव कर्तव्यासाठी रस्त्यावर असतात. सामान्य नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते चोख सेवा बजावतात. कोरोना काळात कर्तव्य बजावताना  निधन झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देण्याची पोलीस आयुक्तांनी केलेली कार्यवाही अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसांची काळजी घेताना त्यांच्यासाठी घरांची निर्मिती झाली पाहिजे यासाठी सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या सोडतीमध्ये पोलीसांसाठी विशेष कोटा असावा असा निर्णय नगरविकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पोलीसांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात अभ्यास सुरु असून खाजगी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काही सदनिकांच्या माध्यमातून पोलीसांना घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक दृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या वसाहतींचा पुर्नविकास गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा असे सांगतानाच पोलीस ठाण्यामध्ये  आलेल्या तक्रारदाराला सौजन्याची वागणूक पोलीसांनी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर वचक बसवितानाच सामान्यांचा विश्वास वृध्दींगत होईल यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्तालयाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनेांच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास ही श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.
गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यावेळी म्हणाले, पोलीसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वाहने सुस्थितीत असणे अत्यावश्यक आहे. आज वितरीत करण्यात आलेल्या वाहनांमुळे पोलीस दलाला सक्षम करण्याचा प्रयत्न असून भविष्यातही अशाच प्रकारे सुसज्ज वाहने पोलीसांना उपलब्ध करुन दिली जातील. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर तातडीने नियुक्ती देण्याचे काम ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे. त्याचे अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयानीही करावे,असे आवाहन श्री.आव्हाड यांनी  यावेळी केले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला जिल्हा नियोजन निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यामाध्यमातून १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देणारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय पहिले असल्याचे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी मंत्री श्री. शिंदे व आव्हाड यांनी नविन वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. या वाहनांच्या माध्यमातून संचलन करण्यात आले. 

Web Title: Thane city police get new vehicles; Eknath shinde, Jitendra Awhad gave it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस