ठाण्यात पाळीव कुत्र्याच्या चाव्याने ६ वर्षीय मुलगा जखमी; मालकाकडून पीडित कुटुंबालाच उलट धमकी
By जितेंद्र कालेकर | Updated: February 21, 2026 22:09 IST2026-02-21T22:09:11+5:302026-02-21T22:09:31+5:30
बाप-लेकीविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाण्यात पाळीव कुत्र्याच्या चाव्याने ६ वर्षीय मुलगा जखमी; मालकाकडून पीडित कुटुंबालाच उलट धमकी
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथे एका सहा वर्षांच्या मुलाला पाळीव कुत्रा चावल्याने चिमुरडा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यानंतरही त्याची मालकीण समृद्धी (२०) आणि तिचे वडील संजीत विश्वकर्मा (५२) यांनी जखमी मुलाच्या नातेवाईकांनाच धमकी दिली. या प्रकरणी जयेश गुप्ता यांनी बाप-लेकी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी शनिवारी दिली.
लाेकमान्यनगर पाडा क्रमांक तीन मधील राधाकृष्ण मंदिरजवळ हा प्रकार १९ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास घडला. समृद्धी आणि संजीत यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला घरात आणि बाहेर सुरक्षितरित्या न ठेवता,घराबाहेर ठेवले. ताे कुत्रा जयेश गुप्ता (२८) यांच्या सहा वर्षीय पुतण्याला (रुद्र) चावला. यात ताे जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तरीही संजीत यांनी गुप्ता यांना उलट धमकी दिली. शिवाय, मुलांना घरी बसवा, नाहीतर अंगावर कुत्रा साेडू, अशीही धमकी आणि आरेरावीची भाषा विश्वकर्मा यांनी केल्याचा आराेप आहे. एक महिन्यापूर्वीही हाच कुत्रा गुप्ता यांच्या अंगावर धावून गेला हाेता. यावेळी त्याने चावा घेऊनही त्याची दखल घेण्याऐवजी उलट धमकी दिल्याचे गुप्ता यांनी म्हटल्याचे पाेलिसांनी सांगितले.