स्वा. सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परूळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:31 AM2019-06-23T01:31:07+5:302019-06-23T01:34:41+5:30

स्वा तंत्र्यवीर वि.दा. सावरकर हे समजणे कठीण नाही; मात्र सावरकरांना जाणण्यासाठी त्यांच्या भूमिकेशी समरस होण्याची नितांत गरज आहे.

SW Savarkar's ideas and thinker Durgesh Parulkar | स्वा. सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परूळकर

स्वा. सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परूळकर

Next

- अनिकेत घमंडी
स्वा तंत्र्यवीर वि.दा. सावरकर हे समजणे कठीण नाही; मात्र सावरकरांना जाणण्यासाठी त्यांच्या भूमिकेशी समरस होण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच, अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये जाताना कोणीही चपला घालून जाऊ नये. अंदमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. तेथे जाऊन स्वत:च्या सेल्फी काढू नका. त्या कारागृहात वास्तव्य केलेल्या अनेकांनी तेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना मरणयातना सहन केल्या आहेत. त्यामुळे ते तीर्थस्थळापेक्षा कमी नाही. सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. त्यामुळे त्यांनी स्वत:संदर्भात उपयुक्ततावादी असल्याचे म्हटले होते. परिवर्तन समाज का अटल नियम है, असं ते मानत होते. म्हणूनच, त्यांनी स्वत:कडे कधीही मोठेपणा घेतला नाही. अशा सावरकर कुटुंबीयांचा अभ्यास करताना स्वत्व हरवून जाते. जीवनातील सर्व अंगांना सावरकरांनी तत्त्वाने जोडून ठेवले होते, हे त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते. जसजसे त्यांचे लिखाण वाचले, तसतशी त्यांच्याबद्दलची आपुलकी, ओढा वाढत गेला. युवकांनो, राष्ट्रभक्त व्हा, असे सावरकरांनी तेव्हाच सांगून ठेवले आहे. त्याची प्रचीती आता हळूहळू येत आहे, असे प्रख्यात हिंदुत्ववादी व्याख्याते, सावरकर अभ्यासक दुर्गेश जयवंत परूळकर यांनी सांगितले.
क्रांतिकारक, उत्तम वक्ता, ज्ञानासक्त, दिलदार मनाचा, व्यापक विचार, विवेकी, मानसिक संतुलन साधलेला, कोणाचाही द्वेष नाही, मत्सर नाही. खऱ्या अर्थाने गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आदर्श पुरुष अशीच सावरकरांची व्याख्या होऊ शकते, असे परूळकरांना वाटते. सावरकर हे भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य, चंद्रगुप्त, गुरुनानक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मानायचे. या सगळ्या आदर्शांचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. सावरकरांनी संस्कृती जोपासली होती. त्यामुळे त्यांच्याकडे तारुण्य सांगणारी तेजस्विता, तत्परता, तपस्विता हे तीनही गुण अखेरपर्यंत होते. ते जीवनभर तरुणच होते, कधीही ते म्हातारे दिसले नाहीत. अखेरपर्यंत त्यांचे केस काळेभोर होते. आदर करणे हा त्यांचा स्वभाव. विरोधी विचार असलेल्या पंडित नेहरूंना त्यांनी सदैव पंडितजी, महात्मा गांधींना नेहमी गांधीजी असे आदरपूर्वकच म्हटले. इतके ते समोरच्यांना आदर द्यायचे. त्यामुळे सावरकरांबद्दल आपण काय बोलायचे, त्यांचा अभ्यास करून चिंतन, मनन केले तरी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे असल्याचे परूळकर सांगतात.
परूळकरांनी सावरकरांसह विविध सामाजिक बांधीलकी, हिंदुत्व, कट्टरता, व्यक्तिमत्त्व विकास आदी सगळ्यांवर आधारित ८० विषयांवर दोन हजार व्याख्याने दिली आहेत. जन्मापासून डोंबिवलीकर आणि आता अंतापर्यंत सावरकरवादी, असे त्यांच्या जीवनाचे समीकरण असल्याचे ते सांगतात. ३० वर्षे त्यांनी अभ्यास वर्ग चालवले. वनवासी विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. कशेळे, कोठिंबा, विक्रमगड, डोंगरपाडा, मुरबाड आदी ठिकाणी त्यांचा यानिमित्ताने प्रवास सुरू असतो. ३५ वर्षे सामाजिक क्षेत्राशी ते संबंधित असून २० वर्षे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानविज्ञान व्याख्यानमालेचे त्यांनी आयोजन केले आहे. असंख्य ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन ते करतात. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, तसेच प्रबोधन अकादमी, ठाणे येथे आयोजित पालक-विद्यार्थी शिबिरांमध्ये ते सातत्याने मार्गदर्शन करत होते. राम वाल्मीकींचा, क्रांतिकारकांच्या मुकुटमण्याचा, खटला श्रीकृष्णाचा या एकांकिकेचे त्यांनी लेखन व सादरीकरण केले आहे. अ. भा. नाट्य परिषदेत स्पर्धेत सादर करण्यासाठी नराग्रणी एकांकिकेचा सोलापूर येथे २०१० मध्ये प्रयोग झाला. वृत्तपत्रांमध्ये लेखन, असंख्य पुस्तकांचे परीक्षण त्यांचे सुरूच असते. भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आजाद, राजगुरू या क्रांतिकारकांवर आधारित धगधगत्या समिधा ही लेखमाला विशेष गाजली. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या सिंहगर्जनेला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील १९ लेखकांचे लेख पुस्तकस्वरूपात प्रसिद्ध झाले.
सावरकरांची राजनीती, क्रांतिवेदीवरील समिधा, क्रांतिकारक बाबाराव, मार्सेलिस पराक्रम, काश्मीर उत्कर्ष आणि संघर्ष, तेजस्वी जीवन, छत्रपती शिवाजी आणि महात्मा गांधी, प्रख्यात व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्यासमवेत शिवरायांची युद्धनीती, पानिपतचा रणसंग्राम, गोवामुक्तीसंग्राम आणि ज्ञातअज्ञात सावरकर आदींचे ग्रंथलेखनही केले आहे.
डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते माजी कार्यवाह आहेत. सावरकर अभ्यास मंडळ, डोंबिवली व मुंबईचे माजी कार्यवाह तसेच सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादरचे ते विश्वस्त आहेत. व्याख्यानांसाठी अंदमान, नाशिक, औरंगाबाद, जालना, पुसद, मुंबई, नेरळ, अमरावती, आटपाडी, बेळगाव, नागपूर, रत्नागिरी, गोवा, पुणे, डोंबिवली, ठाणे आदी सर्व ठिकाणी त्यांचा सातत्याने प्रवास सुरू असतो. २०१५ मध्ये त्यांनी डोंबिवलीत गीता अभ्यास मंडळाची स्थापना केली.
हिंदुत्व आणि सावरकरांवरील गाढे अभ्यासक अशी त्यांची ख्याती असल्यामुळे त्यांना आजवर विवेकानंद केंद्र, डोंबिवलीतर्फे कर्मयोगी पुरस्कार, राष्ट्रभक्त पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता, ठाणे ग्रंथसंग्रहालयाचा ऐतिहासिक ग्रंथ पुरस्कार यासह असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. ३५ वर्षे लिखाणाला झाली असून आताही ते धगधगत्या समिधा, १९६५ चा विजय, धर्म आणि सावरकर या पुस्तकांचे लिखाण करत असून लवकरच ती पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. बुद्धीची देवता गणपती बाप्पा, वडील कै. जयवंत परूळकर यांनी ‘जन्मठेप’ वाच, असे सांगितले होते. प्रा. शिवाजीराव भोसले यांचे राज्यामध्ये कुठेही व्याख्यान असले की, मी ते ऐकायला आवर्जून जायचो. या सगळ्या आदर्शांनीच मला सावरकरांच्या अथांग, अफाट बुद्धिमत्ता असलेल्या दिव्यत्वाची ओळख करून दिली आणि जीवनाला खºया अर्थाने दिशा मिळाली, असे परूळकर सांगतात. युवकांनी राष्ट्रभक्त व्हावे, खूप शिकावे, प्रगती करावी आणि राष्ट्राचे, कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, असे ते सांगतात.

Web Title: SW Savarkar's ideas and thinker Durgesh Parulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.