Sports University plots land under intensity of Metro; Meheranzar on contractor | क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर
क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर

ठाणे : मुंबई मेट्रोच्या टप्पा ४ साठी ठाणे महापालिकेने ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठ साकारले जाणार आहे, ती आपल्या मालकीची सुमारे ७५३९०.०० चौ. मी. क्षेत्राची जमीन ठेकेदाराला विनामूल्य वापरासाठी दिली असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जोपर्यंत मेट्राचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या क्रीडा विद्यापीठाचे भवितव्य अधांतरी आहे. सत्ताधारी यावर मौन असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत असून यासंदर्भात आता आयुक्त संजीव जयस्वाल काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शासन निर्णयानुसार मेट्रो ४ या प्रकल्पासाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी, एमएमआरडीएकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, ठाणे महापालिकेने खाजगी वापराकरीता मेट्रोच्या ठेकेदाराला ही जागा (लेबर कॅम्प, आरएमसी प्लान्ट, कास्टिंग यार्ड) कोणतेही शुल्क न आकारता ताब्यात दिली आहे. वास्तविक पाहता शासनाने ती कायमस्वरुपी मागितलेली नाही. ती जागा ठेकेदार वापरत आहे. त्यामुळे यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकत होते. परंतु, कोणताही मोबदला न घेता, पालिकेने कंत्राटदाराला ही जागा देऊन स्वत:चेच नुकसान करून घेतले आहे.

भाडे वसूल करण्याची मनसेची मागणी
दुसरीकडे शासनाची जागा सर्वसामान्यांना काही काळासाठी वापरण्यास द्यायची झाली तर त्यांच्याकडूून महापालिका भाडे वसूल करते. फेरीवाले, गणपती उत्सव मंडळे, फटाके विक्रेते, शेतकरी यांच्याकडूनही पालिका भाडे वसूल करते.
परंतु, अशा पद्धतीने पालिका एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कशी देऊ शकते, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. त्यात या ठिकाणी भविष्यात बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा विचार असून त्यासाठी रेडीरेकनरच्या १ टक्के दराने भाडेतत्वावर भूखंड देण्याचे निविदेत नमूद आहे.
असे असताना मेट्रोच्या ठेकेदाराला मोफत भूखंड कशासाठी असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ ठेकेदाराकडून जागेचे भाडे वसूल करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे.


Web Title: Sports University plots land under intensity of Metro; Meheranzar on contractor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.