Vinayak Joshi Death : गायक विनायक जोशी यांचे इंदूरला हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:40 AM2020-02-17T05:40:20+5:302020-02-17T05:40:37+5:30

Vinayak Joshi Death : गातानाच वाटले अस्वस्थ मात्र गायन केले पूर्ण; रविवारी अंत्यसंस्कार

Singer Vinayak Joshi died of heart attack in Indore | Vinayak Joshi Death : गायक विनायक जोशी यांचे इंदूरला हृदयविकाराने निधन

Vinayak Joshi Death : गायक विनायक जोशी यांचे इंदूरला हृदयविकाराने निधन

Next

डोंबिवली : ‘सरीवर सरी’, ‘स्वरयात्रा’ यासारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांना मराठी भावगीतांची गोडी लावणारे गायक विनायक जोशी (५९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. इंदूरवरून कार्यक्रम करून परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी पूर्णिमा, मुलगा गंधार आणि सून गेयश्री असे कुटुंब आहे. त्यांच्यावर रविवारी रात्री डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोशी यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित एस.के. अभ्यंकर यांच्याकडे घेतले होते. त्यानंतर, सुगमसंगीतासाठी संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचे, तर गझलगायनासाठी पंडित विजयसिंह चौहान यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. इंदूरला त्यांचा श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त कार्यक्रम होता. तेथे गातानाच अस्वस्थ वाटू लागले; मात्र त्यांनी गाणे अर्धवट सोडले नाही. हा कार्यक्रम संपवून ते डोंबिवलीला परतत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. धुळ्याजवळील सिव्हिल रुग्णालयात त्यांना नेले. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

जोशी हे बँक आॅफ इंडियात नोकरी करत होते. ते काही महिन्यांतच निवृत्त होणार होते. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. तसेच चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. किरण जोगळेकर यांच्या निधनानंतर जोशी यांनी चतुरंग प्रतिष्ठान, डोंबिवली या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे या संस्थेला मोठा धक्का बसला आहे. ‘स्वरयात्रा’, ‘सरींवर सरी’, ‘बाबुल मोरा’, ‘चित्रगंगा’, ‘गीत नवे गाईन मी’, ‘तीन बेगम आणि एक बादशाह’ यासारख्या सांगीतिक कार्यक्रमांचे जोशी हे संकल्पक होते.
वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला ‘वसंत बहार’, गझलकार संदीप गुप्ते यांच्या गझलांवरील ‘जरा सी प्यास’, खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या निवेदनासह ‘सूर नभांगणाचे’, स्वरतीर्थसाठी आयोजित ‘भाभी की चूडियाँ’, वसंत आजगावकर-मधुकर जोशी यांच्या गीतांना ५० वर्षे झाल्यानिमित्ताने ‘करात माझ्या वाजे कंकण’ हे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय झाले. अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथे तसेच दिल्ली-जालंधर-जम्मू येथे के.एल. सेहगल यांच्या गीतांवरचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. जुलैमध्ये ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव ते करत होते. गेल्यावर्षी ‘आदर्श डोंबिवलीकर’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Singer Vinayak Joshi died of heart attack in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.