लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू; शिवसेना आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:16 PM2020-09-14T20:16:19+5:302020-09-14T20:24:27+5:30

लॉज व बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी 

shiv sena mla pratap sarnaik demands action against illegal lodges | लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू; शिवसेना आमदाराचा इशारा

लॉजमुळे कोरोनाचा धोका, कारवाई न झाल्यास आंदोलन करू; शिवसेना आमदाराचा इशारा

Next

मीरारोड- मीरा भाईंदरमधील लॉज हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले असून यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. अशा लॉजसह ऑर्केस्ट्रा बार व बार हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करा, त्यांचे परवाने रद्द करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांना भेटून केली. गांधी जयंती आधी ही कारवाई करावी अन्यथा समाजाच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे . 

शहराच्या वेशीवर स्प्रिंग लॉजिंग व बोर्डिंग, साई सनिधी बार,  बेकयार्ड बीअर गार्डन, आर ब्रीविंग कंपनी पासून उत्तनच्या सिल्वर डोअर, युटर्नपर्यंत अनेक लॉज - बारची बेकायदेशीर बांधकामे आहेत. अंतर्गत बेकायदा बांधकामे झाली या असून छुप्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील लॉज, ऑर्केस्ट्रा बार यामुळे गैरप्रकार वाढले आहेत. लॉजच्या आड अनैतिक व्यवसाय वाढले असून यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे असे सरनाईक म्हणाले. 

कोरोनाच्या संसर्ग काळात तर बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचाशी अर्थपूर्ण व्यवहार करून ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ही बांधकामे झाली आहेत, त्या अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे. गेल्या ५ महिन्यांत झालेली ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महापालिकेने कालबद्ध मोहीम आखून सर्व बांधकामे तात्काळ तोडून टाकावीत. या  महिन्यातच ही मोहीम पूर्ण करावी. 

तरुण पिढीला वाईट मार्गाला लावणारी ही अनैतिक व्यवसायाची केंद्रे असून पालिकेने प्रामाणिकपणे यावर कारवाई करावी व भविष्यात अशी अनैतिक व्यवसाय केंद्रे परत उभी राहणार नाहीत अशी कडक अंमलबजावणी करावी.

मुंबईतील कमला मिल कमपाउंड येथील एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीनंतर मीरा भाईंदर महापालिकेनेही अनेक हॉटेल, रेस्टोरंट, बार, लॉजिंग, बोर्डिंग यांना नोटीसा पाठविल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पूर्णपणे अनधिकृत व विनापरवाना व्यवसाय करत असलेल्यांवर मनपा प्रशासन मेहेरबान आहे का ? असाही प्रश्न आहे.

लॉजिंग - बोर्डिंग - लेडीज बारची बांधकामे करताना त्यात दाटीवाटीने बांधकामे केली गेली आहेत. कोणतीच अग्निसुरक्षा यंत्रणा तेथे नाही. कोणत्याही लॉजिंग - बोर्डिंग व बारला परवानगी देऊ नये असे असे सरनाईक यांनी म्हटले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना भेटून आ. सरनाईक यांनी उपरोक्त मागणी केली व निवेदन दिले. 
 

Web Title: shiv sena mla pratap sarnaik demands action against illegal lodges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.