संवेदनशील भिवंडीला राजकीय हत्यांची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:19 AM2019-08-25T00:19:58+5:302019-08-25T00:20:05+5:30

भिवंडीतील राजकारण स्वार्थीपणाची हद्द ओलांडून गुन्हेगारीकडे वाटचाल करीत आहे. संवेदनशील शहर म्हणून भिवंडी शहराची पूर्वीपासूनच ओळख राहिली आहे.

Sensitive Bhiwandi inflicts political killings | संवेदनशील भिवंडीला राजकीय हत्यांची लागण

संवेदनशील भिवंडीला राजकीय हत्यांची लागण

Next

भिवंडीतील राजकारण स्वार्थीपणाची हद्द ओलांडून गुन्हेगारीकडे वाटचाल करीत आहे. संवेदनशील शहर म्हणून भिवंडी शहराची पूर्वीपासूनच ओळख राहिली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांस आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करताना दिसते, मात्र पोलीस प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने भिवंडीतील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, दरोडे, बलात्काराचे एक नव्हे अनेक गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत रोज दाखल होत आहेत. मात्र या वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रभावी उपाययोजना राबवत नसल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची शंका निर्माण झाली आहे.
भिवंडी शहरातील समदनगर भागात २० जूनच्या रात्री दोन संशयित फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यास दिली. पोलिसांनी मो. साजीद निसार अन्सारी व मो. दानिश मो. फारूक अन्सारी या दोन शार्पशूटर्सना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीची उच्च प्रतीची दोन पिस्तुले व १५ जिवंत काडतुसे सापडली. शहर पोलिसांनी त्यांची कसून तपासणी केली असता २८ जून २०१८ रोजी त्यांनी मो.अलीम निजामुद्दीन सिद्दीकी ऊर्फ अलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष खालीद गुड्डू यांना मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी अलीम बक्कन सरदार यांस व माजी महापौर अहमद हुसेन यांचा भाऊ मो. अश्फाक मंगरू सिद्दीकी या दोघांना अटक केली होती. पुढील तपासात या कटात सहभागी असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक अहमद सिद्दीकी याने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अहमद सिद्दीकी फरार झाले होते. हत्येच्या कटातील आरोपींना पकडण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी भिवंडीतील पोलीस आरोपीला अटक करण्यात हयगय करीत असल्याचा आरोप ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे लेखी तक्र ार करून केला होता. गुड्डू यांच्या लेखी तक्र ारीनंतर शहर पोलिसांनी सखोल तपास करून अखेर अहमद सिद्दीकी यास अटक केली आहे.
भिवंडीतील गुन्हेगारीचे धागेदोरे नव्वदच्या दशकातील जे. जे. हत्याकांडाशी जोडले गेले आहेत. जे. जे. इस्पितळात दाखल चार ते पाच जणांवर रात्रीच्यावेळी घुसून अंदाधुंद गोळीबार केला गेला होता. या हत्याकांडातील आरोपींनी उल्हासनगरातील एका कुख्यात रिसॉर्टमध्ये आसरा घेतल्याची चर्चा होती. त्या हत्याकांडाकरिता वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली होती व ती तत्कालीन नगराध्यक्ष जयंत सूर्यराव यांची होती, असे उघड झाले होते. काही वर्षांपूर्वी राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे भिवंडी मनपाचे गटनेते मनोज म्हात्रे यांचीदेखील राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांद्वारे वाऱ्यासारखे पसरल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. मनोज म्हात्रे राहत असलेल्या इमारतीच्या खालीच दबा धरून बसलेल्या इसमांनी त्यांच्यावर गोळीबार व कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत मनोज म्हात्रे यांच्या मोटारीचा चालक प्रदीप म्हात्रे याने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रशांत म्हात्रे व त्याच्या साथीदारांना अटक केली. सध्या त्यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. या हत्येच्या कटातील आरोपींची धरपकड आजही सुरूच आहे. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवरून मनोज म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्यात वाद निर्माण झाला होता, त्या वादातूनच मनोज यांची हत्या झाली होती.
मनोज म्हात्रे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच प्रभाग क्र. २ मिल्लतनगर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार हमीद सत्तार शेख यांची हत्या करण्याचा कट उघड झाला होता. या हत्येच्या कटाकरिता विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह अन्य दहा जणांविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनपाचे स्थायी समिती सभापती इमरान वली मोहम्मद खान, काँग्रेस नेता मेहबूब ऊर्फ बबलू अन्सारी, उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी, भरत पवार, फिरोज डायमंड, अर्शद अन्सारी व त्यांचे चार अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा हत्येचा कट राजकीय वैमनस्यातून रचण्यात आला होता. मनपा निवडणुकीत हमीद शेख यांच्या पॅनलकडून आपल्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाटू लागल्याने कट रचण्यात आला होता. त्यासाठी अंबरनाथ येथील गुंडांना सुपारी दिली होती. हमीद शेख ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये लिपिकाचे काम करीत असल्याने त्यांना रस्त्यातच ठार मारण्याचा इरादा होता. सुदैवाने या हत्येच्या कटाचे संभाषण असलेले मोबाइल रेकॉर्डिंग हमीद शेख यांना मिळाल्याने शेख यांच्या हत्येचा कट उधळला गेला व त्यांचा जीव वाचला.
या घटनांमधून भिवंडीतील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा भेसूर चेहरा पुन:पुन्हा दृष्टिक्षेपात आला आहे. नगरसेवकपदासाठी खुनाचा कट व हत्या यांसारख्या घटना भिवंडीत अगदी राजरोसपणे घडत आहेत. राजकीय प्रतिस्पर्धकाला संपवण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. भिवंडी हे शहर धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आहेच. ऐंशीच्या दशकात येथे दंगल झाली होती. त्यानंतर पोलीस स्टेशन उभारण्याच्या वादातून दोन पोलिसांची हत्या झाली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भिवंडीतील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे भिवंडी अधिक संवेदनशील बनले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात सामील असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. पोलीस चौकशीनंतर त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेने भिवंडीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेमुळे भिवंडीतील राजकारणातील गुन्हेगारीच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

Web Title: Sensitive Bhiwandi inflicts political killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.