ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:17 PM2022-05-28T20:17:47+5:302022-05-28T20:18:02+5:30

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

RTO action against those speeding e scooters illegally | ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

Next

ठाणे :

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बॅटरीमध्ये फेरफार झालेल्या स्कूटरवर कारवाईची मोहीम सुरू केली असून अशा ५० स्कूटरवर आतापर्यंत कारवाई केल्याची माहिती ठाणे आरटीओने शनिवारी दिली.

राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनाकरिता इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण अवलंबले आहे. अशा दुचाकींना मोटार वाहनकरातून सूट दिलेली आहे. ताशी २५ किमीपेक्षा कमी वेगाच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीची आवश्यकता नाही. ते चालविण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) ची आवश्यकता नाही. त्यामुळे २५० वॅट बॅटरीच्या स्कूटरच्या खरेदीचा वेग वाढला आहे. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यामुळे अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करून वेग वाढविण्याचा प्रयत्न करतात. बॅटरीची क्षमता वाढविल्याने वाहनांचा वेग वाढत असला, तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशाच काही दुचाकींना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर बेकायदेशीरपणे धावणाऱ्या अशा दुचाकींवर कारवाईचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले.

इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार आरटीओ मान्यताप्राप्त संस्थेचे (व्हेइकल मॉडेल) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र असलेल्या वाहनांनाच नोंदणीमध्ये आरटीओकडून सवलत मिळते. मात्र, असे प्रमाणपत्र न घेता, परस्पर दुचाकीत बदल करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. ठाण्यात १९ ते २७ मे दरम्यान अनधिकृत इलेक्ट्रिक दुचाकीवर कारवाईची धडक मोहीम आरटीओने सुरू केली आहे. आतापर्यंत ५० दुचाकी ठाणे आरटीओने जप्त केल्या. त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होणार आहे. ठाण्यात गेल्या वर्षभरामध्ये एक हजार २९६ दुचाकींची नोंद झाली आहे. ज्या वाहनांना नोंदणीतून सूट आहे, तरीही त्यांनी अंतर्गत बदल केले आहेत. अशा वाहनांवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

""आरटीओकडे नोंदणी न करण्यासाठी एकीकडे सवलत मिळवायची आणि दुसरीकडे वेग वाढविण्यासाठी बॅटरी किंवा अन्य मार्गाने अंतर्गत बदल करायचे. अशा इलेक्ट्रिकल दुचाकींवर कारवाई केली जात आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाण्यातील दुचाकींवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे कोणीही वाहनांमध्ये अंतर्गत बदल करू नये. तसे बदल करणारे पुरवठादार आणि उत्पादक यांचाही शोध घेण्यात येत आहे.""
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Web Title: RTO action against those speeding e scooters illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे