A rat's bag on a train passengers' bag in the Sahyadri Express | सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर

सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर

डोंबिवली: कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते व विधि अधिकारी ललीत वाईकर हे सह्याद्री एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असतांना ‘एस-६’ या बोगीमध्ये प्रवाशांच्या बॅगवर जीवंत उंदीर फिरताना आढळून आल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. मंगळवारी सकाळी कर्जत ते नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या रेल्वे प्रशासनाची अनास्था या निमित्ताने उघड झाली आहे. रेल्वे हा उंदरांसारख्या प्राण्यांचा अड्डा आहे का? असे वाईकर म्हणाले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा दिखावूपणा कशाला हवा असा संतप्त सवाल वाईकर यांनी केला. देशभर स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. केंद्रापासून ते गल्लीपर्यंत त्याचे नारे दिले जातात. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, सामाजिक संस्था त्यासाठी नियोजन करतात, पण ते खरे नसून सगळा दिखावा असल्याची टीका त्यांनी केली. बॅगवर मोठा उंदीर बघून डब्यात एकच कल्ला झाला. डब्यात कोणताही अटेंडंट नसल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न होता. रेल्वेच्या डब्यात असा मोठा उंदीर वावरत असेल तर प्रवासी सुरक्षित प्रवास कसा करु शकतील, असा सवाल करुन वाईकर म्हणाले की, लहान मुले असो की, वृद्ध यांना रात्री झोपेत उंदीर चावला तर त्याला जबाबदार कोण? डब्यातील उंदराच्या वावराचा किळसवाणा प्रकार संतप्त करणारा असल्याने आपण तातडीने सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केल्याचे ते म्हणाले. प्रवाशांच्या सोबत अन्नपदार्थ असतात. खाद्यपदार्थांच्या पिशवीत उंदीर शिरला असता तर, असा सवाल करुन वाईकर म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गृहित धरु नये. प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेता तर त्यांना चांगली, दर्जेदार सुविधा देणे रेल्वेचे कर्तव्य आहे. गलिच्छ कारभार करु नका, अशा शब्दात त्यांनी रेल्वे प्रशासनाचे कान टोचले आहेत. हा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात त्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या विषयाला वाचा फोडावी, आणि रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा अशी मागणी केली.
 

Web Title: A rat's bag on a train passengers' bag in the Sahyadri Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.