शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज विरोधकांत रंगली टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:59 PM2021-11-28T15:59:32+5:302021-11-28T16:00:29+5:30

कळव्यातील शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्याचवेळी आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात रंगलेल्या टोलेबाजीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.

Rangali tolebaji between veteran opponents of Shiv Sena and NCP | शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज विरोधकांत रंगली टोलेबाजी

अडीच कोटींच्या निधीतून कळव्यात नविन जलवाहिनीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे अडीच कोटींच्या निधीतून कळव्यात नविन जलवाहिनीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एरव्ही, एकमेकांच्या विरोधात असलेले कळव्यातील शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्याचवेळी आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात रंगलेल्या टोलेबाजीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. अडीच कोटींच्या खर्चातून कळव्यात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी ही राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली.
कळव्यातील पाणी पुरवठयामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने नवीन वाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, गृहनिर्माणमंत्री आव्हाड आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. या कामासाठी निधी नव्हता. महापालिका आयुक्तांनी ही बाब सांगितल्यावर नगरविकास विभागाकडून त्याची त्वरित प्रशासकीय मंजुरी घेऊन आता या कामाला सुरु वात झाली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. हाच धागा पकडून आव्हाड म्हणाले, निधी हवा असेल तर सरकार किंवा महापालिकेकडे जाऊ नका. खासदारांकडे जा, पोरासाठी बाप कधीही तयार असतो! आव्हाड यांच्या या - विधानाला अर्थातच नगरविकास मंत्रीपदी एकनाथ शिंदे असल्याचा संदर्भ होता. आम्हाला निधी मिळाल्याशी मतलब आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
त्यावर लगेचच डॉ. शिंदे यांनी हा आव्हाड यांच्या मनाचा मोठेपणा असून त्यांच्याकडेही गृहनिर्माण विभागासारखे महत्त्वाचे खाते आहे. त्यांच्याकडेही भरपूर निधी आहे. पण शेवटी सगळे विषय नगरविकास विभागाकडे येऊन थांबतात.
मुंब्य्रात आपण चांगले काम केले आहे. पण आवश्यकता असल्यास आपल्याला आणखी निधी नगरविकास विभाग दिल्याशिवाय राहणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. त्यानंतर मी हवे तर तुमच्या हातापाया पडतो, पण मुंब्य्रासाठी मी मागत असलेला २५ कोटींचा निधी मिळवून द्या, अशी हात जोडून विनंती आव्हाड यांनी केल्यानंतर एकच हशा पिकला. हसतखेळत रंगलेल्या या राजकीय मैफिलीचा मनमुराद आनंद कळवा खारेगाववासीयांनी लुटला.
* आघाडीमुळे राजकीय विरोधक एकत्र-
*खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आव्हाड यांचा कळवा - मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघही येतो.२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यातही डॉ. शिंदे आणि आव्हाड यांच्यात कळवा-मुंब्रा मतदारसंघात कट्टर राजकीय स्पर्धा होती. विविध प्रकल्पांसंदर्भात श्रेय घेण्याची चढाओढ लागलेली तसेच परस्परांवर कठोर शब्दांत केलेली टीकाही त्या वेळी मतदारांनी पाहिली. परंतु, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यामुळे सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये किमान सार्वजनिक व्यासपीठावर तरी गोडी गुलाबीचे वातावरण आहे. त्याचेच प्रतिबिंब शनिवारी झालेल्या कार्यक्र मात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गेल्या वेळी आव्हाड यांच्या विरोधात २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतून उमेदवारी लढविणारे उपनेते दशरथ पाटील आणि स्थानिक नगरसेवक उमेश पाटील हेही आव्हाड यांच्यासमवेत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Rangali tolebaji between veteran opponents of Shiv Sena and NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.