पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:43 PM2019-08-02T23:43:32+5:302019-08-02T23:44:15+5:30

महालक्ष्मी एक्स्प्रेस : रेल्वेचा बेजबाबदारपणा उघड

Railways took risks even after giving full information | पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला

पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला

Next

पंकज पाटील

बदलापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेस २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात अडकल्यानंतर, हे प्रकरण रेल्वेने तहसीलदारांवर शेकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, रेल्वेचे हे प्रयत्न हाणून पाडत, तहसीलदारांनी दिलेल्या उत्तरामुळे रेल्वेचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची कल्पना बदलापुरातील उपस्टेशन प्रबंधकांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका तहसीलदारांनी ठेवला आहे. एवढेच नव्हे तर, पुराची माहिती देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्याचेही समोर आले आहे. तहसीलदार कार्यालयाने रेल्वेला सतर्क राहण्याच्या सूचना देऊनही रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

२६ जुलै रोजी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही २७ जुलै रोजी पहाटे चामटोली गावाजवळ पुराच्या पाण्यात अडकली होती. या प्रकरणात कुणाची चूक आहे, ते शोधण्याच्या भानगडीत न पडता शासकीय यंत्रणांनी सर्वात आधी प्रवाशांना वाचवण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, या यशस्वी मोहिमेनंतर रेल्वेविषयी प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. पुरात एक्स्प्रेस अडकण्यामागे रेल्वेचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप होत असल्याने रेल्वे अधिकाºयांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी हे प्रकरण तहसीलदार कार्यालयावर शेकण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या सहकार्यकारी अभियंत्यांनी तहसीलदारांना २९ जुलै रोजी पत्र पाठवत बारवी धरणातून पाणी सोडल्याची माहिती न दिल्याचे आणि पुराची माहिती न दिल्याचा आरोप करत खुलासा मागवला होता. रेल्वेच्या या पत्राला अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तरामुळे रेल्वे प्रशासन तोंडघशी पडले आहे.
अंबरनाथ तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने २६ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजता बदलापूरच्या उपस्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात अंबरनाथ तहसील कार्यालयातील कर्मचारी रवींद्र शिंदे यांना पाठवण्यात आले होते. त्यावेळी उपस्टेशन प्रबंधक यांना पूरपरिस्थितीची कल्पना देऊन तहसीलदारांचे बोलणेही करून दिले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांनी उद्धट वर्तन करत तहसीलदारांनाच बेजबाबदार उत्तर दिले. रेल्वेचे अधिकारी हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे तहसीलदारांच्या लक्षात आले. शासनाचा प्रतिनिधी रेल्वे अधिकाºयांच्या कार्यालयात माहिती देण्यासाठी जातीने गेल्यावरही त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. तहसीलदारांनी आपली जबाबदारी पार पाडली असतानाही, रेल्वेने मात्र हे प्रकरण गांभीर्याने न घेता महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रेल्वेचे बेजबाबदार पत्र आले अंगलट
रेल्वे अधिकाºयांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस प्रकरणात बारवी धरणाला जबाबदार धरत तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. या पत्रात बारवी धरणातून पाणी सोडल्याची कल्पना रेल्वेला न दिल्याने सर्व प्रकार घडल्याचा ठपका ठेवला. याप्रकरणी रेल्वेने तहसीलदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे अधिकाºयांनी हे पत्र पाठवताना बारवी धरणातून नेमके पाणी सोडले की नाही, याची चाचपणी केली नाही. रेल्वेच्या पत्रात बारवीतून पाणी सोडल्याचा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या दिवशी बारवीतून पाणीच सोडले नव्हते. रेल्वेचे अज्ञान रेल्वेच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

पूर्वतयारीच्या बैठकीत स्टेशन प्रबंधक अनुपस्थित : अंबरनाथ तहसीलदारांनी ६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या कार्यालयात नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला रेल्वेचे उपप्रबंधक यांनाही हजर राहण्याचे पत्र दिले होते. मात्र, या बैठकीला अंबरनाथ आणि बदलापूरचे स्टेशन उपप्रबंधक हजर राहिले नव्हते. ही चूकदेखील तहसीलदारांनी निदर्शनास आणून दिली आहे. तहसीलदारांनी दिलेल्या पत्रात बदलापूर रेल्वे उपप्रबंधक हे कारवाईस पात्र असल्याचे म्हटले.

Web Title: Railways took risks even after giving full information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.