Prisoner threatens police to blow up a police van bomb | पोलीस व्हॅन बॉम्बने उडवून ठार मारण्याची कैद्यांनी पोलिसांना दिली धमकी
ठाणे न्यायालयाच्या आवारातील प्रकार

ठळक मुद्देठाणे न्यायालयाच्या आवारातील प्रकारपोलीस कर्मचाऱ्याचा हात पिरगळून केली मारहाणखारघर पोलिसांनी वर्ग केला ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : न्यायालयाच्या आवारात कैद्यांना चहा तसेच खाद्यपदार्थ खाण्यास विरोध दर्शवल्याने पोलीस व्हॅनच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन बंदोबस्तावरील अमरदीप जाधव (२४) या नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या कॉन्स्टेबलचा हात पिरगळून मारहाण करणाºया जेम्स अल्मेडा आणि जगदीश दया या आरोपींविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात बुधवारी (२१ आॅगस्ट रोजी) गुन्हा दाखल झाला आहे. ७ आॅगस्ट २०१९ रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत आधी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. हीच तक्रार आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे.
तळोजा कारागृहातून ठाणे सत्र न्यायालयात अल्मेडा याच्यासह योगेश भारद्वाज, जगदीश दया, राहुल कांबळे, नितीन अवघडे आणि नरेश गुजरन ऊर्फ भंडारी अशा सहा न्यायालयीन बंद्यांना ७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आणले होते. तिथेच अल्मेडा आणि दया या कैद्यांनी एका चहावाल्याला चहा देण्यासाठी आवाज दिला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याठिकाणी न्यायालयीन बंदींना चहा किंवा कोणताही खाद्यपदार्थ देण्याची अनुमती नसल्याने बंदोबस्तावरील पनवेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार यांनी त्यांना विरोध दर्शविला. याचाच राग आल्याने त्यांनी पवार यांच्यासह तिथे असलेल्या पोलिसांशी वाद घातला. जेम्स आणि दया यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात दरोडा, शस्त्र बाळगणे तसेच मकोकासंदर्भातील गुन्हा दाखल आहे. याबाबतची चर्चा नातेवाईक आणि त्यांच्या वकिलांमध्ये सुरू होती. त्यावेळी नातेवाइकांनी त्यांना पुन्हा खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न केला. त्यालाच विरोध केल्याने या दोघांपैकी अल्मेडा याने ‘हम चार साल जेल काट के आये है, हमारी हिस्ट्री निकालो, मै कौन हू तुमको दिखा दूंगा, असे म्हणत उपनिरीक्षक पवार यांच्याशी हुज्जत घातली. नंतर, पोलिसांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन पोलीस व्हॅनच बॉम्बने उडवून देण्याचीही त्याने धमकी दिली. पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचाही उजवा हात पिरगळून त्यांना त्याने मारहाण केली. त्यानंतर, आरोपी जगदीश यानेही उपनिरीक्षक पवार यांना धमकी दिली. त्यानंतर, तिथे मध्यस्थीसाठी आलेले रबाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनाही या आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर, याप्रकरणी ७ आॅगस्ट रोजी खारघर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ आणि मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करण्यात आली. हा सर्व प्रकार ठाण्यात घडल्याने हे प्रकरण आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात वर्ग केले असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.

Web Title:  Prisoner threatens police to blow up a police van bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.