मीरा-भाईंदर महापालिकेचा प्रताप; नैसर्गिक खाड्यांनाच ठरवले नाले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 01:18 AM2020-12-01T01:18:01+5:302020-12-01T01:18:24+5:30

काॅंक्रिटच्या बांधकामाचा घाट : वनशक्ती संस्थेकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी

Pratap of Mira Bhayander Municipal Corporation; Only natural creeks | मीरा-भाईंदर महापालिकेचा प्रताप; नैसर्गिक खाड्यांनाच ठरवले नाले  

मीरा-भाईंदर महापालिकेचा प्रताप; नैसर्गिक खाड्यांनाच ठरवले नाले  

Next

मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने नैसर्गिक खाड्यांना आणि खाडीपात्र परिसरास चक्क नाले ठरवून काँक्रिटचे पक्के नाले बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमएकडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट घातला आहे. तर, एमसीझेडएमए आणि कांदळवन सेलनेही खाड्यांना नाले ठरवून अटीशर्तींवर प्राथमिक परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षणकर्तेच पर्यावरणाच्या मुळावर उठल्याने या सर्वांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे.

पालिकेने उत्तननाका ते पालीपर्यंतची नैसर्गिक नवीखाडी ही चक्क नाला म्हणून नमूद केली आहे. वास्तविक, ही खाडी समुद्राला मिळणारी असून या ठिकाणी खाडीपात्रात दाट कांदळवन आहे. या खाडीपात्रात पालिकेने बेकायदा सांडपाणी सोडले असून पालिकेच्या आशीर्वादाने येथे कांदळवन तोडून भराव व बांधकामे झाली आहेत. खाडीचा नाला सांगून या ठिकाणी काँक्रि टच्या भिंती उभारून पक्का नाला करण्याचा प्रस्ताव पालिकेने एमसीझेडएमएकडे दिला आहे. मीरा रोडच्या कनकिया येथील संत थॉमस शाळा ते खाडीपर्यंतचा नाला पालिकेने मंजुरीसाठी एमसीझेडएमएकडे दिला होता. येथे पूर्वीपासून कांदळवन होते आणि ते नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तरीही, पालिकेने कोणतीही परवानगी नसताना आधीच कांदळवनात आधी कच्चा आणि नंतर काँक्रिटचा पक्का नाला बांधला आहे. भाईंदर पश्चिमेच्या क्रांतीनगर ते बजरंगनगर आणि ओमसई कॉम्प्लेक्स ते जयअंबेनगर व वसई खाडीपर्यंतही दोन पक्के काँक्रिट नाले बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणीही नैसर्गिक खाडीप्रवाह असून अनेक झाडे माफियांनी तोडून येथे भराव करून बांधकामे केली आहेत. मीरा रोडच्या संत जोसेफ शाळा ते सृष्टी पूलपर्यंतचा परिसर हा जाफरी खाडी व खाडीपात्राचा परिसर आहे. तेथेही काँक्रिटचा नाला बांधण्याचा घाट पालिकेने घातला आहे.

कांदळवन सेलच्या अहवालाचा दिला हवाला
धक्कादायक बाब म्हणजे एमसीझेडएमएच्या २७ व २८ ऑक्टाेबरला झालेल्या बैठक क्रमांक १४७ मध्ये यातील उत्तनची नवी खाडीवगळता अन्य चार ठिकाणी नाले बांधण्याची परवानगी अटीशर्तींची पूर्तता करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. त्यासाठी या चार ठिकाणी कांदळवन नसून ५० मीटरचा बफर झोन असल्याचा कांदळवन सेलच्या पाहणी अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता.

Web Title: Pratap of Mira Bhayander Municipal Corporation; Only natural creeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.