ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पोलिसांनी हस्तगत केली ५३ लाखांची रोकड

By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2019 11:55 PM2019-10-18T23:55:46+5:302019-10-19T00:06:39+5:30

एकीकडे निवडणूकीचे वातावरण तापत असतांनाच ठाण्यात अण्णाभाऊ साठे आर्थिक घोटाळया प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून ठाण्यात कारागृहात परतण्याऐवजी ते ओवळा येथील एका खासगी घरात गेल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Police seized Rs 53 lakh from NCP's MLA in Thane | ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पोलिसांनी हस्तगत केली ५३ लाखांची रोकड

मुंबईत उपचारानंतर जेलमध्ये जाण्याऐवजी गेले ठाण्यातील फ्लॅटवर

Next
ठळक मुद्देघोडबंदर येथील कारवाईमुंबईत उपचारानंतर जेलमध्ये जाण्याऐवजी गेले ठाण्यातील फ्लॅटवरआयकर विभागाकडूनही चौकशी सुरु

ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्याकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि कासारवडवली पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये ५३ लाख ४६ हजारांची रोकड शुक्रवारी दुपारी हस्तगत केली आहे. ठाण्यातून एक महत्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे सांगून कदम यांनी कैदी पार्र्टीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना ठाण्यात आणले. तेंव्हा घोडबंदर रोडवरील एका घरातूनच त्यांना या रोकडसहित पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अण्णा भाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळयातील प्रकरणामध्ये कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणामध्ये ते न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. १८ आॅक्टोंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर ठाण्यातील एका मित्राकडून एक महत्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे कैदी पार्टीसाठी त्यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांना त्यांनी सांगितले. या पोलिसांनीही नियम धाब्यावर बसवत त्यांची मागणी मान्य केली. त्यांना मुंबईतून ठाण्यातील कारागृहात नेण्याऐवजी घोडबंदर रोड ओवळा येथे एका खासगी कारने आणले. ओवळा येथील ‘पुष्पांजली रेसिडेंन्सी’ इमारतीमधील तिस-या मजल्यावरील राजू खरे यांच्या खोलीत नेले. तिथून ते हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारी असतांनाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना ५३ लाख ४६ हजारांच्या रोकडसहित रंगेहाथ पकडले. ते कैदी पार्टीतील पोलिसांबरोबर खासगी कारने घोडबंदर रोडवरील एका खासगी फ्लॅटवर गेल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. हीच माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग, कासारवडवली पोलीस आणि निवडणूक विभागाचे भरारी पथक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कदम यांच्याकडे मिळालेली ही रोकड आता निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
ही रोकड निवडणूकीसाठी जमविली राजू खरे यांचा दावा
दरम्यान, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा असलेली ही रोकड आपली असून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ती जमविल्याचाही दावा राजू खरे यांनी केला आहे. आयकर विभागाकडूनही याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली
..........................
कैदी पार्टीतील पोलीस येणार अडचणीत
कदम यांच्यासोबत बंदोबस्ताला असणा-या कैदी पार्टीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी आमदार कदम यांना पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेण्याऐवजी ओवळा येथील फ्लॅटवर नेले. तिथे नेण्यासाठी या पोलिसांनी कोणाची परवानगी घेतली? वरिष्ठांना याची कल्पना दिली होती का? कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली होती का? निवडणूक काळात आमदार कदम ही रोकड नेमकी कोणाला देणार होते? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच कैदी पार्टीतील पोलीस पथक आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पथकावर नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पुरेशा बंदोबस्तामध्ये कदम यांची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
........................
सोलापूरातून अपक्ष म्हणून उमेदवारी
कदम यांनी विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोलापूर जिल्हयातील मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रचारासाठी आपल्याला मुभा मिळावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, न्यायालयाने ही याचिका अलिकडेच फेटाळली असल्याचे समजते.

Web Title: Police seized Rs 53 lakh from NCP's MLA in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.