पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:07 AM2019-10-17T00:07:08+5:302019-10-17T00:07:20+5:30

ठाणे पोलिसांनी लावला छडा : आरोपीचा मात्र सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे उघड

Police officer's murder resolved after 27 years | पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

Next

ठाणे : पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग पाटील यांच्या खून प्रकरणाचा तब्बल २७ वर्षांनी उलगडा झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच महिने तपास करून आरोपी इबरार नन्हे खान याच्या पत्नीचे दिल्ली येथील घर गाठले. पण, २०१२ मध्येच त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस हताश झाले.


पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध घेऊनही तो मिळाला नव्हता. पाटील यांचे वडील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना भेटले. त्यांनी मुलाचा मारेकरी खानच्या अटकेची मागणी जून २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी हा तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनी तिचे घरही शोधले. सखोल चौकशीत २०१२ मध्येच एका आजाराने इबरारचा मृत्यू झाल्याची माहिती ठाकरे यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे, राहुल पवार, रवींद्र पाटील आणि तौशिफ पठाण आदींच्या तपासात समोर आली. कठोर परिश्रम घेत आरोपीचा पाठपुरावा केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने ही फाइल आता कायमचीच बंद करावी लागणार असल्याचे शल्य तपास पथकातील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. इबरारला १९९३ मध्ये मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने खरे नाव लपवून सलीम खान अशी ओळख सांगितली होती. त्यावेळी तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

आरोपीला पकडताना झाली होती हत्या : उपनिरीक्षक महेंद्रसिंग यांची कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेमणूक होती. इबरार हा फरारी आरोपी शहाड पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २३ जुलै १९९२ रोजी रात्री आपल्या पथकासह पाटील त्याला पकडण्यासाठी गेले होते. रिक्षाने जातानाच त्यांना तो दिसला. तेव्हा मोठ्या धाडसाने त्यांनी त्याचा पाठलागही केला. मात्र, पुलाच्या खांबाआड लपलेल्या खानने पाटील यांच्यावर चॉपरने नऊ वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इबरार खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथमध्ये खानची त्यावेळी दहशत होती.

Web Title: Police officer's murder resolved after 27 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.