पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 03:16 AM2020-12-02T03:16:18+5:302020-12-02T03:16:26+5:30

लक्ष्मीचंद छेडा यांना १३९ कोटी वसुलीसाठी नोटीस

PMC Bank warns to seize building for recovery; Residents are heartbroken | पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

Next

नारायण जाधव

ठाणे : मोठमोठ्या विकासक आणि उद्योजकांना नियमबाह्यरीत्या कोट्यवधींची कर्जे दिल्याने हजारो कोटींनी डबघाईस आलेल्या 
पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बँक अर्थात पीएमसी बँकेने आता कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मुसक्या आवळल्या आहेत. याअंतर्गत नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांना १३९ कोटी चार लाख २० हजार 
६३५ रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस बजावली आहे.

दोन महिन्यांत सदरची कर्जफेड केली नाही, तर त्यांच्या सुदृढ कन्स्ट्रक्शन्सने बेलापूर येथे बांधलेल्या सोसायटीतील सर्व इमारती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. सुदृढ कन्स्ट्रक्शन्सने बेलापूर सेक्टर १५ येथे भूखंड क्रमांक २८ वर बद्रीनाथ, केदारनाथ, हृषीकेश, सह्याद्री, लेण्याद्री या इमारतींची सोसायटी बांधून त्यातील सदनिका विकल्या आहेत. हा भूखंड तारण ठेवून लक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांनी सुदृढ कन्स्ट्रक्शन्सच्या नावे पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले आहे. मात्र, विहित मुदतीत त्याची परतफेड न केल्याने व्याजासह कर्जाची रक्कम १३९ कोटी चार लाख २० हजार ६३५ रुपयांच्या घरात गेली आहे. त्याच्याच वसुलीसाठी बँकेने लक्ष्मीचंद 
छेडा यांच्यासह हन्सा लक्ष्मीचंद छेडा, रुचिक लक्ष्मीचंद छेडा, निमित लक्ष्मीचंद छेडा यांना २७ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावून हे कर्ज न फेडल्यास ठाणे कोर्टात दावा दाखल करून उपरोक्त सोसायटीतील सर्व इमारती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे या पाच इमारतींत घरे घेणाऱ्या १००च्या आसपास सदनिकाधारकांचे धाबे दणाणले असून बँकेच्या नोटिसीमुळे ते हवालदिल झाले आहेत.

घोटाळ्यावर घोटाळे
लक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांनी हे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतलेले असताना त्यांच्या उपरोक्त सोसायट्यांमध्ये सदनिका घेणाऱ्या १००च्या आसपास रहिवाशांनीही घर घेण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतल्याची चर्चा आहे. म्हणजे जो भूखंड आधीच तारण आहे, त्यावरील इमारतींमधील घरांसाठीही काही बँकांनी कर्ज दिल्याने या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. विशेष म्हणजे यासाठी सिडकोची एनओसीही घेतली नसल्याचे सांगण्यात येते.
 

Web Title: PMC Bank warns to seize building for recovery; Residents are heartbroken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.