कोविड रुग्णांसाठी ठाण्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात प्लाझ्मादान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 11:48 PM2020-11-26T23:48:52+5:302020-11-26T23:49:23+5:30

महापौरांची माहिती : कोरोनामुक्त दात्यांना केले आवाहन

Plasma donation center at Kovid patients at Shivaji Maharaj Hospital, Thane | कोविड रुग्णांसाठी ठाण्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात प्लाझ्मादान केंद्र

कोविड रुग्णांसाठी ठाण्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात प्लाझ्मादान केंद्र

Next

ठाणे : कोविड-१९ रुग्णांवर प्लाझ्मा उपचारपद्धती वरदान ठरत असून महापौर नरेश म्हस्के यांच्या सूचनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मादान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोनामुक्त दात्यांनी जास्तीतजास्त संख्येने प्लाझ्मादान करण्याचे आवाहन महापौर आणि आयुक्तांनी केले आहे.

कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये प्रतिकारशक्ती (ॲण्टीबॉडी) असल्याने ते रुग्णास दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन तो बरा होण्यास मदत होत असल्याने हे प्लाझ्मादान केंद्र सुरू केले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य मिळाले असून या सुविधेसाठी केंद्रीय आणि राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी मिळालेली आहे. कोविडपासून बरे झालेल्या व्यक्तींची उपचारानंतर आरटी-पीसीआरची चाचणी निगेटिव्ह आल्यापासून २८ दिवसांनंतर व चार महिन्यांपर्यंत त्या व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. कोरोनातून बरे झालेल्या प्लाझ्मादात्यांची चाचणी करण्यात येते. प्लाझ्मामध्ये प्रतिकारशक्ती योग्य प्रमाणात असल्यास रुग्ण बरा होण्यास मदत होते. यामुळे प्लाझ्मादान करण्यासाठी जास्तीतजास्त कोरोनामुक्त दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सरकारी रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत सेवा 
ठाणे परिसरातील सरकारी रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी ही सेवा नि:शुल्क पुरवण्यात येत आहे. मात्र, खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी ती सेवा शासकीय नियमानुसार शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. शिवकुमार कोरी यांच्या सहकार्याने रक्तपेढी विभागामार्फत प्लाझ्मादान केंद्रातील ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Web Title: Plasma donation center at Kovid patients at Shivaji Maharaj Hospital, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.