एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिजचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:52 AM2020-09-26T00:52:52+5:302020-09-26T00:52:58+5:30

‘कॉल आॅन डेब्रिज’चे तीनतेरा : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारवाईकडे कानाडोळा

Piles of debris in the MIDC area | एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिजचे ढिगारे

एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिजचे ढिगारे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : इमारतीची बांधकामे व दुरुस्तीमुळे निर्माण होणारे डेब्रिज उचलण्यासाठी केडीएमसीने ‘कॉल आॅन डेब्रिज’ ही सुविधा जून २०१७ मध्ये सुरू केली होती. परंतु, नागरिकांच्या प्रतिसादाअभावी ती बंद पडली. पुन्हा डिसेंबर २०१९ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाने या योजनेसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करून त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते. परंतु, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असून, या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र एमआयडीसी परिसरात पाहायला मिळत आहे. या परिसरात सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे. ते उचलले जात नसल्याने डेब्रिजचे ढीग जमा झाले आहेत.


शहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणारी बांधकामे व दुरुस्तीच्या कामांमधून मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होते. बऱ्याच वेळा त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने धूळ निर्माण होते. परिणामी, आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात जून २०१७ मध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधत केडीएमसीने डेब्रिजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू केले होते. याकामी एजन्सी नियुक्त करून टोल फ्री नंबरही जाहीर केला होता. परंतु, कालांतराने या नंबरवर कॉल केल्यास तो उचलला जात नव्हता, तसेच कॉल करूनही काही वेळेला कार्यवाही होत नव्हती. अखेर, या योजनेचा बोºया वाजल्याने ती बंद पडली.


दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाने डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा ही योजना सुरू केली. त्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर केला आहे. डेब्रिज इतरत्र टाकू नये, अन्यथा कारवाई तर होईलच, पण डेब्रिज उचलण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्चही वसूल केला जाईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले होते. मात्र, एमआयडीसीतील पेंढरकर महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात आहे. बरेच दिवस ते उचलले गेले नसल्याने या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. या जागेचा डेब्रिज टाकण्यासाठी सर्रासपणे वापर केला जात असून याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने डेब्रिजचा ढीग वाढतच आहे.

Web Title: Piles of debris in the MIDC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.