एकमेकांना घेऊन चालण्याचा पेरेंचा राज्यकर्त्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:07 AM2020-01-16T01:07:38+5:302020-01-16T01:08:11+5:30

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला : ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा या विषयावर गुंफले पाचवे पुष्प

 Perennial advice to governors to walk with one another | एकमेकांना घेऊन चालण्याचा पेरेंचा राज्यकर्त्यांना सल्ला

एकमेकांना घेऊन चालण्याचा पेरेंचा राज्यकर्त्यांना सल्ला

Next

ठाणे : जो नेता मतदाराला देव मानेल त्याला वैकुंठात जागा मिळेल, हे शास्त्र सांगते. त्यांनी त्यांचे काम इमानेइतबारे करावे. संतांनी केले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. आपल्या मतदारसंघाचा, देशाचा विकास करा, एकमेकांना घेऊन चला असा सल्ला औरंगाबाद येथील पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी दिला. तुमच्याकडे किती ताकद आहे, किती पैसा आणि अक्कल आहे याला किंमत नसते तर तुम्हाला किती जणांना घेऊन चालता येते, त्याला महत्त्व असते असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प पेरे यांनी सोमवारी गुंफले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गंगेवर सफाई कामगारांचे पाय धुतले, त्याचे पण राजकारण केले. टीका करणाऱ्यांनी धुवून पाहावे. मोदींनी जे केले ते उपजत असावे लागते, अशा शब्दांत त्यांनी मोदींचे कौतुक केले. ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा या विषयावर ते बोलत होते. १९९५ पासून मी पाटोदा गावात काम करीत आहे. पाच हजारांहून अधिक गावांत फिरलो आहे. मला तीन वेळा आंतरराष्ट्रीय ग्रामस्वच्छता परिषदेतदेखील आमंत्रित केले. मी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना प्रशिक्षण देतोय. गावात लोकांना स्वच्छ पाणी दिले, पाण्याचा पुनर्वापर केला, फळझाडे लावली, परिसर स्वच्छ ठेवला आणि मुलांचे चांगले शिक्षण केले तर आपण महासत्ता होऊ शकतो. महासत्ता म्हणजे प्रत्येक गाव आणि आपला देश हा स्वत:च्या पायावर उभा राहीला पाहिजे आणि हे सोपे आहे. देशाचा जवान आणि खेड्यातील बाई आपल्याकडे प्रामाणिकपणाने काम करीत असल्याचे पेरे म्हणाले.

सरपंचांमुळे खेड्यातील लोकांचे आयुष्य कमी झाले
समाज आणि शासनातले सरपंच हे पोस्टमन आहेत असे सांगून लोकांचा सरपंचावर विश्वासच राहिलेला नाही, सरपंच बदनाम झाले, खेड्यापाड्यातील लोकांचे आयुष्य कमी झाले हे त्यांचेच पाप आहे. कारण त्यांनी कामेच तशी केलेली आहेत. अन्न, शिक्षण, पाणी चांगले नाही. तसेच, एकमेकांमधले हेवेदावे, स्वार्थीपणादेखील कारणीभूत आहे. मी लोकांना पाच ते दहा टक्केच शिकवतो उरलेले त्यांच्याकडून काम करून घेतो. लोकांना शिकवायला गेलो की राग येतो.

प्रत्येक घरातून वर्षातून एकदा साडेतीन हजार रुपये कर घेतला जातो, त्यातून त्यांना चार प्रकाराचे स्वच्छ पाणी देतो, महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गिरणी सुरू केली, त्यात मसाल्याच्या गिरण्या, डाळीच्या गिरण्या आहेत. बटाटे चिप्स करून देतो. वायफाय फ्री आहे. या करातून वरील सर्व त्यांना फ्री दिले जाते. वर्षाला दोन लाख रुपये माझ्या गावाला नफा होतो. सरकारी निधीतून नविन कामे करतो. कपटी सरपंचाने आपला कपटीपणा चांगल्या कामासाठी वापरावा असा सल्ला त्यांनी दिला. सरकारच्या ९६० योजना आहेत आणि या योजनांचा लाभ मिळो अथवा न मिळो पण लोक या योजनांच्या आहारी गेले आहेत की, आता ३३ कोटी लोकसंख्या १२५ कोटी करण्याचे कामही शासनावर टाका असा खोचक टोला त्यांनी लगावला.

या योजनांची लाज वाटते असे सांगून त्यांचा समाजाला काही फायदा नसल्याचे ते म्हणाले. सरकारला असे वाटते आम्ही खूप देतोय आणि माणसाला वाटते आम्हाला काही मिळत नाही असे सांगताना पेरे म्हणाले हल्ली जो तो मोर्चा काढतोय कारण माणूस समाधानीच राहीलेला नाही. सरकार एक शौचालय बांधायला १२ हजार रुपये देते. पण आम्ही १७ वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांचे कर्ज काढून शौचालय बांधले. तीन दिवसांत मी माझे गाव हागणदारीमुक्त केले.

जोपर्यंत मुर्ख मतदार आहेत तोपर्यंत पुढारी असेच असणार, जेव्हा मतदार शहाणे होतील तेव्हा या पुढाऱ्यांना कळेल असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. राजकारण्यांनी आई होण्याची गरज आहे. तुम्हाला समाजाला काही तरी चांगले द्यावे लागेल. आपण आपले गाव, देश, मतदारसंघ चांगले दिसले पाहिजे यासाठी झटले पाहिजे असा सल्ला त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.

Web Title:  Perennial advice to governors to walk with one another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.