वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 05:34 PM2019-08-21T17:34:51+5:302019-08-21T17:35:19+5:30

महावितरणच्या कल्याण परिमंडळाची चालू थकबाकी सुमारे १०२ कोटी ६६ लाखांवर पोहोचली आहे.

Order to break electricity supply of electricity bills outstanding | वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश

वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश

Next

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळाची चालू थकबाकी सुमारे १०२ कोटी ६६ लाखांवर पोहोचली आहे. यामुळे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी चालू वीज देयक थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी व  कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ऑगस्ट महिन्यात कल्याण परिमंडळातील दोन लाख ९८ हजार ५०० घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही चालू थकबाकी आहे. मुख्यालयातील आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडळातील कल्याण-१, कल्याण-२, वसई व पालघर या चार मंडळ कार्यालयाअंतर्गत सुमारे २३ लाख ३० हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यातील अनेक ग्राहक नियमित वीजबिल भरणा करत नाहीत. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळलेल्या अद्ययावत यादीनुसार ही कारवाई होणार आहे. थकाबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाने अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास त्यांच्यावर वीज कायदा-२००५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल दाखल करण्यात येणार आहे.

पुनर्जोडणी शुल्क भरणा अत्यावश्यक

थकबाकीमुळे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सिंगल फेज ग्राहकांना १००रु. थ्री फेज ग्राहकांना २००रु., उच्चदाब ग्राहकांना ५०० रु. व १८ टक्के जीएसटी हे पुनर्जोडणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक असते. पण बऱ्याच वेळा या नियमाचे पालन होताना दिसत नाही. यामुळे महावितरणचा महसूल बुडतो. त्यामुळे वीजबिल थकीत ग्राहकांनी थकीत बिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीज जोडू देऊ नये, असे आदेश ही देण्यात आले आहेत. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

मंडळ निहाय आकडेवारी

कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण-१ मंडळातील ५५,७०० ग्राहकांकडे सुमारे १४ कोटी १६ लाखांची थकबाकी आहे. कल्याण-२ मंडळातील ८२,५०० ग्राहकांकडे सुमारे २९ कोटी ८६ लाख इतकी तर पालघर मंडळातील ३९,९०० ग्राहकांकडे सुमारे १२ कोटी २५ लाख एवढी थकबाकी आहे. तर वसई मंडळ कार्यलयांतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक लाख २० हजार ग्राहकांकडे सुमारे ४६ कोटी ३७ लाख इतकी चालू थकबाकी आहे.

ऑनलाइन पेमेंटची सुविधा

महावितरणचे ग्राहक थकीत वीजबिल महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर भरू शकतात. तसेच महावितरणची अधिकृत वेबसाईट व मोबाईल अँप यांच्या माध्यमातूनही ग्राहक ऑनलाईन वीज बिल भरणा करू शकतात. सदरची कटू कारवाही टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू थकबाकी वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केले आहे.

Web Title: Order to break electricity supply of electricity bills outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज