Offense traffic on two vehicles exceeding capacity | क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या ८५० वाहनांवर गुन्हा
क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या ८५० वाहनांवर गुन्हा

- पंकज रोडेकर 

ठाणे : राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करून राजरोस वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) नियमित कारवाई सुरूच असते. तरीसुद्धा हे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. यानुसार, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या सुमारे ८५० वाहनांविरोधात मागील दोन दिवसांत एफआयआर दाखल केले. त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यांत ४६४ दोषी वाहनांद्वारे ५९ लाख ५० हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एफआयआर दाखल होण्याची बहुधा राज्यातील पहिलीच कारवाई असावी, असेही म्हटले जात आहे.

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने गायकवाड यांनी तपासणी केलेल्या काही जुन्या आणि नव्या अशा ८४८ गाड्यांवर २ आणि ५ आॅगस्ट रोजी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल केले. यामध्ये २ आॅगस्टला ६९४, तर ५ आॅगस्ट रोजी १५४ असे ८४८ एफआयआर दाखल केले आहेत. ते ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांत तपासणीतील दोषी वाहनांवर केले आहेत. तसेच भिवंडीत आणखी १५० ते २०० एफआयआर दाखल करण्यासाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यांत केलेल्या तपासणीत ४६४ वाहने दोषी आढळून आली असून त्यांच्याकडून ५९ लाख ५० हजार ६०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती आरटीओने दिली.

किती मालवाहतूक करता येते?
मालवाहतूक करणाºया सहाचाकी वाहनांना ९ ते १० टन तसेच १० चाकी वाहनांना जवळपास १५ ते १६ टन वाहतूक करण्याची परवानगी आहे.
असा आकारला जातो दंड
मोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार, कारवाई केली जाते. पहिल्या टनाला अडीच हजार रुपये असून त्यापुढील टनाला प्रति हजार रुपये दंडाची रक्कम वाढण्यात येते.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८४८ एफआयआर दाखल केले आहेत. तसेच २०० वाहनांवर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून तेही लवकरच दाखल होतील. त्याचबरोबर ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
-रवी गायकवाड, आरटीओ अधिकारी, ठाणे

Web Title: Offense traffic on two vehicles exceeding capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.