प्लाझ्मादात्यांची संख्या ठाणे शहरात नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:22 AM2020-09-27T00:22:45+5:302020-09-27T00:23:00+5:30

सामाजिक संस्थांची खंत । दात्यांना आवाहन

The number of plasma donors is negligible in Thane city | प्लाझ्मादात्यांची संख्या ठाणे शहरात नगण्यच

प्लाझ्मादात्यांची संख्या ठाणे शहरात नगण्यच

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाशी लढून बरे झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत प्लाझ्मादान करणाऱ्या ठाणेकरांची संख्या फारच कमी असल्याची खंत ठाण्यातील सामाजिक संस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी प्लाझ्मादान करण्याचे आवाहन करणारे उपक्रम या सामाजिक संस्थांनी हाती घेतले आहेत. ठाण्यातील झेप प्रतिष्ठान आणि समता विचार प्रसारक संस्था प्लाझ्मादान आणि रक्तदानासाठी बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांना आवाहन करीत आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे बरे झालेले आहेत. परंतु, त्या तुलनेत बरे झालेले हे रुग्ण प्लाझ्मादानासाठी पुढे येत नसल्याने ठाण्यातील झेप प्रतिष्ठान आणि समता विचार प्रसारक संस्था यांनी प्लाझ्मादानासह रक्तदानासाठी ठाणेकरांना आवाहन केले आहे.
प्लाझ्मादानाविषयी लोकांमध्ये अद्यापही जागृती झालेली नाही. तसेच, सरकारनेही त्यासाठी आवाहन केले नसल्याने प्लाझ्मादानासाठी लोक फारसे पुढे येत नसल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. प्लाझ्मादान हे कोरोनाग्रस्तांना काही अंशी उपयोगी पडत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्लाझ्मादानासाठी अद्याप फारसे ठाणेकर पुढे येत नाहीत.
बरे होऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहन झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी केले. तसेच, ब्लडबँकेमध्ये रक्ताची गरज भासत असल्याने झेपतर्फे येत्या ४ आॅक्टोबर रोजी रक्तदान शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या घटण्यासाठी जागरूक नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे. आपले काही बांधव कोरोनाशी झुंज देत आहेत. त्यांना मदतीचा हात हवा आहे. त्यामुळे जे बरे होऊन परतले आहेत, त्यांनी रक्तदान आणि प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले यांनी केले.

प्लाझ्मादानामुळे कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे एका अभ्यासात म्हटले आहे. जनजागृतीअभावी लोक प्लाझ्मादानासाठी पुढे येत नाहीत. कोरोना आणि त्याचे उपचार या भ्रमात जनता पडली असल्याने प्लाझ्मादानाकडे लोक फारसे वळताना दिसत नाहीत.
- डॉ. प्राजक्ता लाडे

Web Title: The number of plasma donors is negligible in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.