शासनास ५० लाखांचा मुद्रांक शुल्क कमी भरणाऱ्या ओस्तवाल बिल्डरला दंडासह मुद्रांक भरण्याच्या नोटिसा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 02:49 PM2020-11-25T14:49:31+5:302020-11-25T14:51:01+5:30

Stamp Duty : ५० लाख मुद्रांक शुल्कासह दरमहा २ टक्के प्रमाणे दंड भरण्यास सांगितले आहे.

Notice to Ostwal builder for paying less stamp duty of Rs 50 lakh to the government | शासनास ५० लाखांचा मुद्रांक शुल्क कमी भरणाऱ्या ओस्तवाल बिल्डरला दंडासह मुद्रांक भरण्याच्या नोटिसा  

शासनास ५० लाखांचा मुद्रांक शुल्क कमी भरणाऱ्या ओस्तवाल बिल्डरला दंडासह मुद्रांक भरण्याच्या नोटिसा  

Next

मीरारोड - जमीन मालकांसोबत त्यांच्या जमिनीचा विकास करारनामा २०१५ साली नोंदणीकृत करताना शासनाचा तब्बल ५० लाखांचा मुद्रांक महसूल कमी भरणाऱ्या विकासकास आता तक्रारी नंतर ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत. ५० लाख मुद्रांक शुल्कासह दरमहा २ टक्के प्रमाणे दंड भरण्यास सांगितले आहे.

मीरारोडच्या झंकार कंपनीची जागा ही राजेंद्र वडगामा व कुटुंबीयांची आहे. सदर जमीन विकसित करण्यासाठी वडगामा कुटुंब व ओस्तवाल बिल्डरचे कुलदीप उमरावसिंह ओस्तवाल यांच्यात जमिनीवर इमारत विकसित करण्याचा करारनामा झाला. १६ मे २०१५ रोजी तीन वेगवेगळ्या स्वरूपातील करारनाम्याने सदर व्यवहार नोंदणीकृत केला होता.

भाईंदर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय - ७ येथे सदर तीन करारनामे नोंदणीकृत करताना त्याचे  ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते . परंतु सदर मुद्रांक शुल्क भरताना करारनाम्यातील व्यवहार आणि प्रत्यक्षातील त्याचे बाजारमूल्य तसेच सदर जमीन विकास आराखड्यानुसार औद्योगिक झोनमध्ये येत असल्याबाबतची सविस्तर तक्रार सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी मुद्रांक विभागकडे केली होती . परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने थेट मुद्रांक नोंदणीचे महानिरीक्षक तसेच लाचलुचपत खात्याकडे तक्रारी केल्या . 

त्यानंतर मात्र सह जिल्हा निबंधक वर्ग १, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील सहाय्यक नगररचनाकार यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले. दिलेल्या अहवालानुसार जमीन मालक वडगामा कुटुंबियांना ४५ टक्के नुसार मिळणाऱ्या मोबदल्याचे स्वरूप विचारात घेता त्याचे मूल्य ६ कोटी ३२ लाख तर विकासक कुलदीप ओस्तवालना ५५ टक्के प्रमाणे मिळणाऱ्या मोबदल्याची मूल्य ९ कोटी ५५ लाख इतके निश्चित केले. त्यामुळे जास्तीचे मूल्य मूल्यांकन म्हणून विचारात घेण्यात आले.

त्या अनुषंगाने सदर तिन्ही नोंदणीकृत करारनाम्या द्वारे कुलदीप ओस्तवाल यांनी  १ कोटी ९५ लाख ४७ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क भरायला हवे असताना  ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये मुद्रांक भरले.  जेणे करून शासनाचा ४९ लाख ४८ हजार ८०० रुपये इतका मुद्रांक महसूल बुडवला गेला. सदर कमी भरलेल्या मुद्रांक शुल्का सह मे २०१५ पासून आज पर्यंत त्यावर दर महा २ टक्के प्रमाणे दंड भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वाबीकर यांनी कुलदीप ओस्तवाल याना बजावली आहे.

औद्योगिक झोन असताना निवासी दराने मुद्रांक शुल्क भरले गेले. मुद्रांक चोरीच्या या संगनमताच्या प्रकाराने विकासक व सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे साटेलोटे चव्हाट्यावर आले आहे. सदर प्रकार हा कट कारस्थान करून नियोजनबद्ध रित्या शासनाचे मुद्रांक शुल्क चोरी करण्याचा आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून सर्वच प्रकरणांची चौकशी करण्यात यावी आणि अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी कृष्णा गुप्ता यांनी केली आहे.

तर विकासक कुलदीप ओस्तवाल म्हणाले कि, नोंदणी करताना सह दुय्यम निबंधक कार्यालयाने जेवढी रक्कम सांगितली तेवढी रक्कम आम्ही मुद्रांक शुल्क म्हणून भरली होती. त्यामुळे मी मुद्रांक कमी भरले यात तथ्य नाही. आता मुद्रांक शुल्क कमी भरल्या बाबतच्या नोटिसी बाबत सर्व कागदपत्रे पाहून आमच्या वकिला मार्फत उत्तर दिले जाईल.

 

Web Title: Notice to Ostwal builder for paying less stamp duty of Rs 50 lakh to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.