करवसुली चांगली असलेली गावे केडीएमसीत, भाजप, मनसे नेत्यांना दिला राजकीय धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 01:29 AM2020-03-15T01:29:21+5:302020-03-15T01:29:49+5:30

कल्याण पश्चिमेच्या दिशेने महापालिका क्षेत्राला लागून असलेली नऊ गावे महापालिकेतच ठेवली आहेत.

Nine Village in KDMC | करवसुली चांगली असलेली गावे केडीएमसीत, भाजप, मनसे नेत्यांना दिला राजकीय धक्का

करवसुली चांगली असलेली गावे केडीएमसीत, भाजप, मनसे नेत्यांना दिला राजकीय धक्का

Next

- मुरलीधर भवार

कल्याण  - केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय शनिवारी सरकारने विधिमंडळात जाहीर केला. तर, उर्वरित नऊ गावे ही महापालिकेत राहणार आहेत. कल्याण पश्चिमेच्या दिशेने महापालिका क्षेत्राला लागून असलेली नऊ गावे महापालिकेतच ठेवली आहेत. ज्या गावातून महापालिकेला कराचे उत्पन्न मिळाले तीच गावे महापालिकेत ठेवण्याचे ‘अर्थकारण’ यामागे आहे.

भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी महापालिकेत राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्यांचे पिसवली गाव नगरपालिकेत समाविष्ट केले आहे. त्याच वेळी मनसे आ. राजू पाटील यांनी सर्व गावे नगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली असताना त्यांचे काटई हे गाव महापालिकेत समाविष्ट केले आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत संभाव्य भाजप-मनसे युतीला शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
१८ गावांची नगरपालिका जाहीर करताना महापालिका हद्दीलगतची नऊ गावे भौगोलिक सलगतेच्या दृष्टिकोनातून महापालिका हद्दीत कायम ठेवली आहेत. त्यात आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, भोपर, काटई व देसलेपाडा आहे. तर उर्वरित घेसर, हेदुटणे, उंब्रोली, द्वारली, भाल, माणेरे, आशाळे, वसार, नांदिवली, आडीवली, ढोकळी, दावडी, निळजे, कोळे, माणगाव, पिसवली, सोनारपाडा, चिंचपाडा या गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार आहे.
स्वतंत्र नगरपालिकेकरिता संघर्ष करणाऱ्या समितीला सरकार हरकती सूचना मागवून सगळ्याच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणार अशी अपेक्षा होती. त्यामुळे संघर्ष समितीला मागणी मंजूर करवून घेण्यात संपूर्ण यश आलेले नाही.
संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले की, सरकारच्या निर्णयाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी समितीने रविवारी सकाळी वार्तालाप ठेवला आहे.

ग्रोथ सेंटरचा गावे वगळण्याशी संबंध नाही
कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये भोपर, संदप, उसरघर, घेसर, निळजे, काटई, माणगाव, कोळे, हेदुटणे आणि घारीवली या दहा गावांचा समावेश आहे. त्यापैकी भोपर, संदप, उसरघर, काटई आणि घारीवली ही गावे महापालिकेत ठेवली आहेत. घेसर, निळजे, माणगाव, कोळे, हेदुटणे ही पाच गावे स्वतंत्र नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Web Title: Nine Village in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.