राष्ट्रवादी-शिवसेना भांडणांत BJP आमदारानं घेतली महापौरांची भेट, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:30 PM2022-01-17T17:30:15+5:302022-01-17T17:30:36+5:30

आपला प्रमुख विरोधक हा भाजप आहे, असे सांगणाऱ्या महापौरांनी देखील भाजप नेत्यांना भेटीसाठी बोलावणे म्हणजेच नक्की काही तर नारायण नारायण तर घडत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

In the NCP-Shiv Sena quarrel, the BJP MLA Sanjay Kelkar met the mayor Naresh Mhaske | राष्ट्रवादी-शिवसेना भांडणांत BJP आमदारानं घेतली महापौरांची भेट, चर्चेला उधाण

राष्ट्रवादी-शिवसेना भांडणांत BJP आमदारानं घेतली महापौरांची भेट, चर्चेला उधाण

googlenewsNext

ठाणे  : एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत असतांना चर्चेत नसलेल्या भाजप आता चर्चेत आला आहे. सोमवारी महापौर नरेश म्हस्के आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यात महापौर दालनात भेट झाली आणि आता वेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. या भेटीमागचे कारण काय, कोणते नवे राजकारण शिजत आहे, अशी चर्चा आता पालिका वुर्तळात सुरु झाली आहे.

खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. नरेश म्हस्के विरुध्द राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात शाब्दीक वाद रंगू लागले आहेत. त्यामुळे आघाडी होणार का नाही याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु वाद निर्माण करुन चर्चेत राहण्याचा या दोन्ही पक्षांचा हेतू असतांना मागील काही दिवसापासून चर्चेपासून दूर असलेली भाजप मात्र अचानक चर्चेत आली आहे. सोमवारी महापौर दालनात नरेश म्हस्के आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यात भेट झाली. यावेळी म्हस्के यांनी केळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संदीप लेले, मिलिंद पाटणकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे महासभा असेल किंवा इतर पातळ्यांवर शिवसेना विरुध्द भाजप असा लढा मागील कित्येक दिवस ठाणेकर पाहत आहेत. प्रत्येक महासभेत भाजप विरोधी भुमिकेत दिसून आला आहे. भाजप विरुध्द महापौर असा सामना देखील याच ठाणोकरांनी पाहिला आहे. असे असतांना अचानक या भेटीमागचे कारण काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. चाय पे चर्चा म्हणत यावेळी आणखी काही वेगळ्या चर्चा तर झाल्या नाहीत, ना?, अशी धाकधुक आता राष्ट्रवादीत सुरु झाली आहे.

आपला प्रमुख विरोधक हा भाजप आहे, असे सांगणाऱ्या महापौरांनी देखील भाजप नेत्यांना भेटीसाठी बोलावणे म्हणजेच नक्की काही तर नारायण नारायण तर घडत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

मी महापालिकेत आमच्या नगरसेवकांबरोबर चर्चेसाठी गेलो होतो, त्याचवेळेस महापौर म्हस्के हे भाजप गटनेत्याच्या कॅबीन आले आणि त्यांनी मला भेटण्यासाठी आपल्या दालनात बोलावले त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, ही केवळ एक सदीच्छा भेट होती - संजय केळकर - आमदार, भाजप, ठाणे शहर

आमचे मैत्रीचे नाते आहे, ते महापालिकेत दिसले होते, त्यानुसार त्यांना चहापानासाठी बोलावले होते. ते सिनिअर आहेत, त्यात कोणत्याही स्वरुपाचे राजकारण नाही- नरेश म्हस्के - महापौर, ठामपा

Web Title: In the NCP-Shiv Sena quarrel, the BJP MLA Sanjay Kelkar met the mayor Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.