Motorbike burner arrested by Thane Police | मैत्रिणीच्या मित्राची मोटारसायकल जाळणारा जेरबंद
ठाण्याच्या नौपाडयातील घटना

ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडयातील घटना नौपाडा पोलिसांनी लावला छडा चार दिवसात मिळाला आरोपी

ठाणे: जुन्या मैत्रिणीच्या मित्राची मोटारसायकल जाळणा-या निहार बेलोसे (२०, रा. सिद्धेश्वर टॉवर, पाटीलवाडी, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाडयातील राममारुती रोडवरील आदित्य जाधव (१९) यांनी पेट्रोल संपल्यामुळे त्यांची मोटारसायकल २० मे रोजी दुपारी ४.३० वा. च्या सुमारास गणेशवाडीतील साईपॉर्इंट होंडा सर्व्हीस सेंटर च्या समोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यावेळी निहार याने त्यांची मोटारसायकल पेट्रोल ओतून पेटवून दिली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार सुनिल अहिरे आदींच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे यातील संशयित निहार याला रत्नागिरी जिल्हयातील खेडमधील नातूवाडी येथून २३ मे रोजी ताब्यात घेतले. त्याची जुनी मैत्रिण आता आदित्यची मैत्रिण झाली होती. याच रागातून त्याने आदित्यची मोटारसायकल पेटवून दिल्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


Web Title: Motorbike burner arrested by Thane Police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.