महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 01:22 PM2020-09-10T13:22:15+5:302020-09-10T13:22:57+5:30

मनसे आमदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत पत्र लिहत काही मागण्या केल्या आहेत.

MNS MLA Raju Patil's letter to CM regarding conservation of forts in Maharashtra | महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

डोंबिवली - यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालचा डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठाणने घेतले आहे. हे काम लोकवर्गणी मधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत करत आपले कर्तव्य पार पाडले.त्यानंतर आता मनसे आमदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत पत्र लिहत काही मागण्या केल्या आहेत.
 
जगात कुठेही फिरताना ज्या नावामुळे या महाराष्ट्राची ओळख, आपली ओळख आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण हे प्रेम, आदरभावना मनात ठेऊन एका गोष्टीचा राग, उद्वेग, खंत करावीशी वाटते ती म्हणजे छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले त्यांच्या गडकिल्ल्यांची आजची अवस्था. छत्रपतींनी स्वत: बांधलेले, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड किल्ले दुर्लक्षितच राहिले आहेत. खरंच छत्रपतींचं नाव घ्यायला आपली योग्यता आहे का असा प्रश्न मला पडतो. प्रतापगडावर दरड कोसळून तटबंदीला धोका निर्माण झालाय. विशाळगड, पन्हाळगडावर पडझड झालीय. विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळलीय. ‘पण पुरातत्व खाते केंद्राकडे आहे त्यामुळे आपण काहीच करणार नाही’ अशी बोटचेपी भूमिकाच जर महाराष्ट्र शासन घेणार असेल तर हा इतिहास नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

छत्रपतींच्या नावानी केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेंव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही. तरी या पत्राद्वारे मी काही मागण्या आपल्या समोर ठेवत आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी होईल अशी आशा मी करतो.

काय आहेत मागण्या. महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.  दुर्गसंवर्धन खाते निर्माण करून त्यात भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा.   प्रत्येक किल्ल्यावर त्याचा इतिहास, माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.  काही ठिकाणी दृकश्राव्य माध्यमातून ही व्यवस्था होऊ शकते.

शिवाजी महाराजांनी देशावर दुर्गांची मालिका निर्माण करून देश जसा शाश्वत करून घेतला. तसेच आरमार सज्ज करून समुद्रावरही  राज्य केलं. जलदुर्गांची शृंखला निर्माण केली. जलदुर्गातील महत्वपूर्ण किल्ला जो स्वतः शिवाजी महाराजांनी निर्माण केला तो सिंधुदुर्ग शिवकाळातील सिंधुदुर्ग हा एकमेव असा किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे आहेत. यासाठी म्हणून शिवरायांचं स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर असावे. 
कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने त्या ठिकाणी राज्य व केंद्रीय पातळीवर निधी उपलब्ध न होऊन संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा दुर्गाडी किल्ला संरक्षित करावा. आता याकडे राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का हे पाहावे लागेल.

Web Title: MNS MLA Raju Patil's letter to CM regarding conservation of forts in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.