MIDC companies wreak havoc on Dombivali pollution | एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली
एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली

डोंबिवली - एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांपासून कंपन्यांतून सोडले जाणारे प्रदूषित पाणी आणि धुरामुळे रात्री येणाºया उग्र वासामुळे सोनारपाडा, स्टार कॉलनी, तुकारामनगर, आयरे, कोपर आणि ठाकुर्ली परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे.
घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू असताना कंपन्यांनी गुपचूप प्रदूषित पाणी सोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शुक्रवारपासून रात्री ११ ते पहाटेपर्यंत उग्रवास हा वास येत आहे. यासंदर्भात एमआयडीसीकडे अद्याप कोणीही तक्रार केली नाही. तक्रार केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा मोठा प्रश्न पडतो.
प्रदूषण महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने कंपन्या राजरोस उघड्या नाल्यांमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडतात. मध्यंतरी गोळवली भागामध्येही कल्याण-शीळ महामार्गावर निळ्या रंगाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्येही ते जमा झाले होते. टाटा लेनजवळ रस्त्यावर असलेल्या रसायनमिश्रित पाणी साठवण्याच्या टाक्याही ओव्हरफ्लो होऊ न नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले होते. अशा अनेक घटना सातत्याने घडत असूनही प्रदूषण महामंडळ, एमआयडीसी विभाग या घटनांकडे कोणी तक्रार करत नसल्याचे कारण देत दुर्लक्ष करत आहे. पण, यामुळे डोंबिवली शहरात भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याचे गांभीर्यच अधिकाऱ्यांना नाही. सततच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसन, डोळे चुरचुरणे, उलट्या, मळमळणे असा त्रास होत आहे.
यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे म्हणाले की, उघड्या नाल्यांतून रासायनिक सांडपाणी वाहून नेऊ नये यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात अशी समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

‘समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करा’

केंद्र सरकारने २००५ मध्ये मार्गदर्शक पुस्तिका काढली होती; मात्र त्यातील नियमावलीची कधी अंमलबजावणीच झालेली नाही. ज्या कंपन्या प्रदूषण करतात, त्या कंपनीमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल हवेत, अशी मागणी एमआयडीसी परिसरातील रहिवासी प्रफुल देशमुख यांनी केली आहे.

केमिकल कंपन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे, तर अशा कंपन्यांनाना बंधने घालायला हवीत. डिस्प्ले बोर्ड लावून त्यातून प्रदूषणाची तीव्रता किती आहे याची दरदिवशी माहिती देणे आवश्यक आहे. प्रदूषण महामंडळाचे कार्यालय कल्याणमध्ये असल्याने काही घडल्यास डोंबिवली एमआयडीसीत अधिकारी येईपर्यंत होत्याचे नव्हते झालेले असते.

कंपन्यांकडून केंद्र सरकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण मंडळाने तहसीलदार, स्थानिक पोलीस, एमआयडीसी अधिकारी यांची
एक समिती तयार करून त्याद्वारे समस्या मार्गी
लावणे आवश्यक असल्याचे देशमुख म्हणाले.


Web Title: MIDC companies wreak havoc on Dombivali pollution
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.