मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:59 AM2020-09-20T05:59:04+5:302020-09-20T05:59:15+5:30

डीएमआरसीकडून चाचपणी : काही दिवसांत सुरू होणार सर्वेक्षण

Metro 5 runs till Ulhasnagar | मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाचच्या मंजूर मार्गात बदल करण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडून सुरू असताना आता हा मार्ग उल्हासनगरपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सुरू केले आहेत. या कामासाठी भौगोलिक सर्वेक्षण येत्या काही दिवसांत सुरू होईल.
ठाणे-कल्याण-भिवंडी या २४.९ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. ते आॅक्टोबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ८,४१६ कोटी रुपये खर्च केले जातील. २०१३ सालापर्यंत या मार्गावरून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी प्रवास करतील. प्रकल्पाचा वित्तीय अंतर्गत परतावा दर मालमत्ता विकासासह (एफआयआयआर) ६.०२ टक्के इतका असेल. तर, आर्थिक अंतर्गत परतावा (ईआयआरआर) १७.०९ टक्के असेल, असे सांगितले जात आहे.
या मार्गिकेच्या ठाणे-भिवंडी मार्गावरील कामास सुरुवात झाली आहे. मात्र, भिवंडी-कल्याण परिसरातील मार्ग बदलण्यासाठी अनेक निवेदने एमएमआरडीएकडे देण्यात आली आहेत. तसेच, या बदलांसाठी स्थानिक नेतेही आग्रही आहेत. त्यामुळे भिवंडी-कल्याण या टप्प्यातील मार्गिका अंतिम झाल्यानंतर त्या स्थापत्य कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमआरडीएकडून मार्ग बदलांच्या हालचाली सुरू असताना या मार्गाच्या विस्ताराचे नियोजन डीएमआरसीकडून केले जात आहे. राजीव गांधी चौक ते टेमघर आणि दुर्गाडी चौक ते उल्हासनगर असा १५ किमी विस्तार करण्याचे नियोजन आहे. या सेवेमुळे नागरिकांना निश्चितच फायदा होईल असे सांगितले.


... त्यानंतरच ठरणार पुढील दिशा
मेट्रो पाचचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये केली होती. डीएमआरसीने सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा काढून त्याला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भौगोलिक सर्वेक्षणात या मार्गिकेची सुसाध्यता स्पष्ट झाल्यानंतर त्याची व्यवहार्यता तपासणी होईल आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

Web Title: Metro 5 runs till Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो