बुधवारी महापौर निवडणूक : नगरसेवकफुटीची भाजपला धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:07 AM2020-02-22T00:07:12+5:302020-02-22T00:17:59+5:30

बुधवारी महापौर निवडणूक : गोव्याला पंचतारांकित हॉटेलात सगळ्यांचा मुक्काम

Mayor elections on Wednesday: BJP scared of corporatist leakage | बुधवारी महापौर निवडणूक : नगरसेवकफुटीची भाजपला धास्ती

बुधवारी महापौर निवडणूक : नगरसेवकफुटीची भाजपला धास्ती

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी अंतर्गत असंतोष व नाराजीमुळे नगरसेवक फुटण्याची भाजपला धास्ती वाटत आहे. त्यामुळे भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी रात्रीपासून नेण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांचे मोबाइल काढून घेतले असून त्यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना पराभवाची धूळ चारून भाजपच्या बंडखोर गीता जैन यांना शहरवासीयांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यातच राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने मीरा-भार्इंदर भाजपमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कारण, निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक हे अन्य पक्षांतून आले असून त्यातच येणारी पालिका निवडणूक चारच्या प्रभाग पद्धतीने न होता एकेरी पद्धतीने होणार असल्याने बहुतांश नगरसेवक निश्चिंत झाले आहेत.
अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात महापालिकेत मेहतांचा एकछत्री कारभार अनेकांना अनुभवायला मिळाला आहे. नेतृत्व सांगेल व करेल ती पूर्व दिशा, असा प्रकार चालल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी उघडपणे स्थानिक नेतृत्वाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मेहतांचा दबाव झुगारून जैन यांच्यामागे ताकद लावली होती. त्यातच जैन यांना आश्वासन देऊनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपने मेहतांसाठी शब्द फिरवल्याचा आरोप जैन समर्थकांकडून होत आहे. समित्या, स्वीकृत नगरसेवक नियुक्ती आदी सर्वांमध्ये फडणवीस व भाजपने मेहतांनाच झुकते माप दिल्याने आता जैन व समर्थक विश्वासघाताच्या भावनेने दुखावले आहेत.
भाजप नगरसेवकांना २२ फेब्रुवारी रोजी गोव्याला नेणार होते. पण, नगरसेवक फुटण्याच्या भीतीमुळे गुरुवारी रात्रीच जवळपास निम्म्या नगरसेवकांना विमानाने गोव्याला नेण्यात आले आहे.
दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. बाकीचे नगरसेवक शुक्रवारी दुपारी व रात्री, तर काही शनिवारी गोव्याला जाणार आहेत.

सेनेने संपर्क साधू नये यासाठी मोबाइल घेतले काढून

सर्व नगरसेवकांना विमानाने नेले जात असून परत विमानाने आणले जाणार आहे. शिवसेनेकडून कुणीही नगरसेवकांशी संपर्क करू नये म्हणून मोबाइल काढून घेणे, बाहेर पडू न देणे, अशी खबरदारी घेतली आहे. हॉटेल परिसरात व बाहेरही पहारा ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


 

Web Title: Mayor elections on Wednesday: BJP scared of corporatist leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे