मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:01 AM2019-10-09T00:01:53+5:302019-10-09T00:02:02+5:30

राज्यात सर्वप्रथम १९८९ साली मुंबईच्या सायन रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू झाली होती.

Maternal Dairy Company, Newborn, Municipal Hospital Activities for Infants | मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम

मातृदुग्धपेढी नवजात बालकांसाठी नवसंजीवनी, महानगरपालिकेच्या रूग्णालयाचा उपक्रम

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : नवजात बाळासाठी आईचे दूध हे अमृतासारखे असते. मात्र, प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर येणारे काही अडथळे अथवा मातेला दूध नसल्याने नवजात बाळांची आबाळ होऊ नये, त्यांना आईचे दूध मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सुरू केलेली मातृदुग्ध पेढी ही नवजात बालकांना नवसंजीवनी देणारी ठरत आहे. दररोज या पेढीत जवळपास २ लीटर दूध उपलब्ध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात सर्वप्रथम १९८९ साली मुंबईच्या सायन रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू झाली होती. त्यानंतर, ठाणे जिल्ह्यात ठामपा आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १ मे २०१२ रोजी या मातृदुग्ध पेढीची मुहूर्तमेढ रोवली गेली. शस्त्रक्रियेने प्रसूती झालेल्या मातांना सुरूवातीला बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येतात. त्यावेळी मातेला आपल्या बाळाला दूध पाजता येत नसल्याने बालकाला गाईचे किंवा पावडरचे दूध दिले जाते. पण, अशा दूधामध्ये बाळाच्या विकासासाठी पोषक घटक नसतात. अशाप्रकारच्या अनेक कारणांमुळे आईच्या दूधापासून वंचित राहणाऱ्या बालकांसाठी या पेढीची निर्मिती केली गेली आहे. प्रसूती झालेल्या मातेमध्ये दररोज ४०० ते ७०० मी.ली दूधाची तयार होते. त्यातील जास्तीत जास्त ५०० मी.ली दूध बालकाला पुरेसे होते. साधारणत: १५० ते २०० मी.ली. दूध दररोज वाया जाते. हे दूध वाया जाऊ नये, यासाठी रुग्णालयामार्फत प्रसूती होणाºया मातांचे वाया जाणारे दूध संकलित करण्यासाठी जनजागृती केली जाते. ते दूध संकलित करताना मातेकडून तसेच ज्या बालकाला दिले जाणार आहे, त्या बालकाच्या नातेवाइकांकडून त्यासंदर्भात लेखी घेतले जाते. त्यानंतरच ते दूध बालकाला दिले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२०१२ साली ही पेढी सुरू झाली, तेव्हा दररोज २०० ते ३०० मीली दूध संकलित व्हायचे. आता १५०० ते १८०० मीली इतके संकलित होत असून कधी-कधी ते २ लीटरपर्यंतही जाते. दिवसाला साधारणत: १५ ते २० माता वाया जाणारे दूध मातृदूग्ध पेढीत संकलित करण्यासाठी पुढे येत आहेत. हे दूध संकलित केल्यावर त्याच्यावर प्रक्रिया करून निर्जंतूकीकरण केल्यानंतर ते दूध गरज असलेल्या नवजात बालकांना दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेत्रदान, देहदान आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. मात्र, त्यातील देह आणि नेत्रदान मृत्यू झाल्यानंतर केले जाते. पण, त्या दानापेक्षा दुग्धदान हे मोठे दान आहे. हे दान करणाºया मातांची संख्या वाढल्याने दररोज जवळपास २ लीटर मातृदूध पेढीत जमा होत आहे.
- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा रूग्णालय, ठामपा.

Web Title: Maternal Dairy Company, Newborn, Municipal Hospital Activities for Infants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.