प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:04 AM2020-09-22T00:04:29+5:302020-09-22T00:04:43+5:30

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Mansainiks arrested before traveling | प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ती पोलिसांनी फेटाळली. नंतर सर्र्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.
मनसैनिकांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रविवारी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, सकाळी ८.३० वाजता मनसैनिक रेल्वेप्रवासासाठी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्याआधीच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी हे आंदोलन करू नये, असे त्यांना बजावले.
परंतु, जाधव यांनी पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती पोलिसांना केली. त्यांनी ती विनंती नाकारून जाधव यांच्यासह रवींद्र मोरे, महेश कदम, आशीष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सुटका केली.
‘सरकार पडण्याच्या भीतीनेच लोक वेठीस’
पोलिसांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. बससेवा सुरू आहे तिथेही गर्दी असते, तिथे कोरोना पसरणार नाही का? रेल्वे सुरू झाल्यावरच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार का? सरकार घाबरले आहे. सरकारला पडण्याची भीती वाटत असल्यामुळे ते लोकांना वेठीस धरत असल्याचे जाधव पुढे म्हणाले.
भार्इंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल
मीरा रोड : लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी भार्इंदर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्यासाठी मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले गेले. परंतु सोमवारी मीरा भार्इंदरमधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भार्इंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना स्थानकात प्रवेशच करू दिला नाही. मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
बंदोबस्त झुगारून यांनी केला प्रवास
जाधव आणि इतर मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली, तरी दुसरीकडे ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण यांनी तिकीट काढून ठाणे ते मुलुंड असा प्रवास करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश हितापे, जनार्दन खरिवले, हमराज जोशी हे तीन कार्यकर्ते होते. आम्ही तिकीट काढून प्रवास केला. आम्हाला कोणी अडविले नाही. रेल्वेमध्ये गेल्यावर डबा भरलेला होता. कोणतेही सुरक्षित अंतर पाळले गेले नव्हते. रेल्वे ही चाकरमान्यांची गरज आहे, हे दिसून आले. आत असलेल्या सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: Mansainiks arrested before traveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे