Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:43 PM2019-09-21T23:43:00+5:302019-09-21T23:43:39+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, विवेक पंडित, राजीव पाटील, प्रदीप शर्मा, विजय पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी

Maharashtra Vidhan Sabha 2019 The air of greatness; Bawiya, also claiming the front | Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

Vidhan Sabha 2019: महायुतीची हवा; बविआ, आघाडीचाही दावा

Next

- आशिष राणे, हितेन नाईक 

पालघर/वसई : जिल्ह्यातील शहरी भागातील महत्त्वाचे मानले जाणारे दोन मतदारसंघ म्हणजे नालासोपारा व वसई हे बलाढ्य गणले जातात. किंबहुना जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी या दोन्ही मतदारसंघात बविआची मोठी ताकद आहे. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत व त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्हीवेळा युतीचा उमेदवार निवडून आला असून यावेळी मात्र येथील वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात युतीला भरघोस मताधिक्य मिळाले. त्यामुळे सहाजिकच युतीची खास करून शिवसेनेची ताकद वाढली आहे.

यापूर्वीचा बविआचा मजबूत बालेकिल्ला म्हणून असलेल्या वसई व नालासोपाऱ्यात यावेळी बविआला पुन्हा एकदा आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढवावी लागेल, मात्र यावेळी ही लढाई नुसती साधीसुधी व सोपी राहिलेली नाही. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई असेल, किंबहुना युती झाली तर ठाकूर कुटुंबातील कुणीही उभे राहण्याची शक्यता धूसर आहे. बविआमधीलच राजीव पाटील व नारायण मानकर हे दोघे उमेदवार युतीच्या उमेदवारासमोर लढतील,मग नालासोपारा मधून प्रदीप शर्मा असो अथवा वसईतून विवेक पंडित किंवा विजय पाटील एकूणच या सर्वांच्या लढतीलाही ‘करो या मरो’ चे स्वरूप येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघाचा शिवसेनेचा हट्ट भाजपला पूर्ण करावा लागला. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची अपेक्षा वाढली आहे. भाजपलाही जास्त जागा हव्या आहेत. वसई पट्ट्यात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसमोर या वेळी अस्तित्त्वाचे आव्हान आहे.

पालघर जिल्ह्यÞातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पालघर, बोईसर, नालासोपारा व वसई हे चार मतदारसंघ मिळावेत, अशी शिवसेनेची मागणी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असून बंडाळी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आधीच लोकसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा अशा बालेकिल्ल्यात पिछाडीवर पडलेल्या बहुजन विकास आघाडीला आता नव्याने प्रस्थापित होण्यासाठी यावेळी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वसई, नालासोपारा, बोईसर या मतदारसंघात तर भाजपने विक्रमगड व डहाणू तर शिवसेनेने पालघर मतदारसंघांमध्ये विजय संपादन केला होता. त्यावेळी शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजयी झाले होते.
२०१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांची निवड झाली होती.

लोकसभेला धक्का ; युतीची वाटचाल सुरू झाली !
पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. २००९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकूर यांच्या आघाडीने विजय संपादन केला होता. गेल्या निवडणुकीत तीन आमदार निवडून आले होते. पण पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि गेल्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार मागे पडला. विशेष म्हणजे वसई या बालेकिल्ल्यात ठाकूर यांच्या आघाडीचा उमेदवार पिछाडीवर पडला. यातच बोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत
प्रवेश केला.

वसईत उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता !
वसई मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे.त्यातच ६० हजारहून अधिक ख्रिश्चन समाजातील मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे युतीतर्फे ख्रिश्चन समाजातील उमेदवार रिंगण्यात उतरविण्याची चाचपणी अलिकडे करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि कवी सायमन मार्टिन यांचे नाव चर्चेत होते. तर काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून तर प्रचाराला सुरु वातही केली होती.
मात्र काँग्रेसने ऐनवेळी ओनिल आल्मेडा यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली. आता त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यास अपवाद म्हणून माजी आमदार विवेक पंडित या मतदारसंघातून इच्छुक आहेत किंवा नसतीलही. पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
माझे विचार जुळत नाही असे म्हणून पंडित इच्छुक नाही असे जरी पंडित म्हणत असले तरी विजय पाटील यांना पंडितसह इतरही शिवसैनिक व भाजपचे पदाधिकारी आमदारकीचा उमेदवार म्हणून पाहू शकतील का ? ही सुद्धा एक अटकळ आहे. त्यामुळे वसईत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज हे दोन विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात उतरणार का, युतीची जोरदार लाट असल्याने नारायण मानकर, प्रवीणा ठाकूर यांना बविआकडून पुढे उमेदवार म्हणून घोषित करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वचपा काढण्याची संधी
लोकसभा निवडणुकीत बविआचे शिटी हे चिन्ह गोठविण्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याने बविआने या सर्वांचा वचपा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचे असलेले संबंध पाहता शिवसेनेवर मात करण्याच्या दृष्टीने या हालचाली तर नाहीत ना?अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बंडखोरीची शक्यता
बोईसरमधील बविआचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने समीकरण बदलले असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सेनेचे जगदीश धोडी,कमलाकर दळवी यांनी तरे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सेनेत स्वागत केले असून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रथम प्रयत्न करावेत नंतरच त्यांच्या उमेदवारीचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचार करावा असा मेसेज त्यांनी प्रसारमध्यमांद्वारे दिला आहे. त्यामुळे तरे यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीची शक्यता आहे.

भाजपला कडवी लढत मिळण्याची शक्यता
डहाणू विधानसभेवर भाजपचे पास्कल धनारे हे निवडून आले असले तरी लोकसभा निवडणुकीत माकपने बविआला दिलेल्या पाठबळामुळे माकपची ताकद वाढली असून भाजपला मोठी कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. विक्रमगड मतदार संघावर माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे निवडून आले. त्यांचे मतदारसंघाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्याबद्दल नाराजी असूनही त्यांचा मुलगा डॉ. हेमंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून ते आपले वजन वापरत आहेत. प्रकाश निकम यांनी सवरांना कडवी टक्कर दिली होती. यावर्षी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असले तरी त्यांच्या उमेदवारीची शक्यता कमी असल्याचे शिवसेनेच्या गटातून सांगितले जाते. तर राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी कंबर कसली आहे.

वसई -नालासोपारात हवा केवळ युतीची !
नालासोपारा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत मतांची मोठी आघाडी मिळाल्याने भाजप-शिवसेना युतीला हा मतदारसंघ अधिक सुरक्षित आणि आशेचा वाटू लागला आहे.
माजी पोलीस अधिकारी आणि चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी या मतदारसंघातून लढण्याचे आधीच जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश ही केला. तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक हे उमेदवारीचे दावेदार असून भाजपने हा मतदारसंघ पूर्वीपासून बांधल्याने भाजपलाच उमेदवारी मिळण्याची आशा होती.
त्यातच या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांची २३ टक्के असलेली संख्या पाहता मतदार म्हणून त्यांची भूमिकाही महत्त्वाची व निर्णायक ठरणार आहे. तरीही युतीची हवा पाहता आणि क्षितीज ठाकूरांच्या जागी राजीव पाटील हे सुद्धा शर्मा यांना आव्हान देऊ शकतात.

आघाडीचे गणित काय ?
नेहमीप्रमाणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दरवेळी पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर आघाडी पक्षाने बविआला सोडल्या आहेत. त्यामुळे वसईत काँग्रेस व राष्ट्रवादी ची ताकद कधी वाढलीच नाही,याउलट ती ठाकूरांच्यामुळेच लयास गेली असे आघाडीतील सांगतात.

सध्याचे पक्षीय बलाबल
वसई : बहुजन विकास आघाडी
नालासोपारा : बहुजन विकास आघाडी
बोईसर : बहुजन विकास आघाडी
डहाणू : भाजप
विक्र मगड : भाजप
पालघर : शिवसेना

युतीच्या लाटेमुळे
हितेंद्र ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला !
खरंतर मागील दोन वर्षांत लोकसभा निवडणुकीत बविआचे मताधिक्य सहाही विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक झाले आणि शिवसेनेला आपली खरी ताकद येथे असल्याचे जाणवले. मात्र नंतर मागे न पाहता युतीचा झंझावात करीत मतदारसंघात युतीची लाट निर्माण केली आणि पोटनिवडणुकीत विजय मिळविला. आज बविआच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ठाकूर यांना एक कडवे आव्हान दिले आहे.

घोडा यांच्याबाबत नाराजी : पालघर विधानसभा मतदारसंघ सेनेकडे असल्याने आमदार अमित घोडा यांच्याबाबत नाराजी आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा, डॉ.विश्वास वळवी,दिनेश तारवी हे इच्छुक रांगेत असल्याने अजूनही उमेदवाराची घोषणा सेनेने केलेली नाही.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 The air of greatness; Bawiya, also claiming the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.